शेतकऱ्यांच्या आदिवासी जमिनीवर बेकायदेशीर कब्जा;खेड तालुक्यातील कडूस येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 10:50 IST2025-08-29T10:50:24+5:302025-08-29T10:50:38+5:30
- उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन, ठोस कारवाई करण्याची मागणी

शेतकऱ्यांच्या आदिवासी जमिनीवर बेकायदेशीर कब्जा;खेड तालुक्यातील कडूस येथील प्रकार
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील कडूस येथे आदिवासी ठाकर समाजाच्या जमिनीवर बेकायदेशीररीत्या कब्जा केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गट क्रमांक ३७७५ मधील ही जमीन आठ व्यक्तींनी बेकायदेशीरपणे आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करावी आणि जमीन मूळ मालकांना परत मिळावी, या मागणीसाठी पीडित शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खेड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
या बेकायदेशीर व्यवहाराविरोधात फौजदारी कारवाई करावी आणि आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलनात तुषार गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड, पीडित शेतकरी बबन काळे, भाऊ काळे, सीताराम जाधव, बबन भालेराव, पोपट पारधी, पंढरीनाथ पारधी यांच्यासह आदिवासी ठाकर समाजाचे बांधव सहभागी झाले. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी अनिल दौंडे यांना सादर करण्यात आले.
परवानगी न घेता खरेदी-विक्रीचा व्यवहार
जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ३६अ आणि ३६ब या कलमांनुसार शेरा असताना, सक्षम प्राताधिकाऱ्यांची परवानगी न घेता खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. आदिवासी बांधवांच्या अशिक्षितपणा आणि अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन हा गैरप्रकार घडल्याचा आरोप आहे.