आमदारांच्या पी.ए.ची अवस्था दुर्दैवी, मग सामान्य माणसाचं काय? – रोहित पवारांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 15:03 IST2025-04-05T15:01:32+5:302025-04-05T15:03:46+5:30
सरकारने यावर सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.

आमदारांच्या पी.ए.ची अवस्था दुर्दैवी, मग सामान्य माणसाचं काय? – रोहित पवारांचा संतप्त सवाल
- किरण शिंदे
पुणे - राज्याचे विरोधी पक्ष नेते रोहित पवार यांनी नुकत्याच घडलेल्या काही महत्त्वाच्या प्रकरणांवर प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांवरच खापर फोडले आहे. त्यावरून आज राज्याचे विरोधी पक्ष नेते रोहित पवार यांनी रुग्णालयावर संताप व्यक्त केला.
दीनानाथ हॉस्पिटल प्रकरणावर बोलताना त्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. सत्तेत असणाऱ्या आमदारांच्या पी. ए.ची अशी परिस्थिती असेल, तर सामान्य गरीब माणसाने काय करायचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रोहित पवार म्हणाले, जे काही या कुटुंबाकडून सांगितलं जातंय, त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सरकारने यावर सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. जर फक्त पैशांअभावी एखाद्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागत असेल, तर ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, कोकाटे यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी टोला लगावला ते म्हणाले,'रोज जॅकेट बदलणाऱ्या मंत्र्याला शेतकऱ्यांचा फाटका साजरा कसा दिसणार? लोकांच्या अडचणी सोडवा, उगाच अक्कल नका दाखवू. त्यांनी कृषीमंत्र्यांवरही टीका करत म्हटलं, कर्जमाफी केली म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात पैसे जातातच असं नाही, हे जर मंत्र्यांना माहिती नसेल, तर सरकार किती महान आहे हे समजतं.
जयकुमार गोरे प्रकरणावरही पवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. प्रभाकर देशमुख असोत की आम्ही, आम्ही कुणालाही घाबरत नाही. देशमुखांच्या घरी मध्यरात्री पोलीस गेले, महिलांना जी वागणूक दिली, ती चुकीची होती. यावर सोमवारी न्यायालयात सुनावणी आहे, आणि न्याय व्यवस्थेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बारामती व्हायरल व्हिडिओ प्रकरणात मारहाणीबाबत पवार म्हणाले की, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. मारहाण करणे पूर्णतः चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.वक्फ विधेयकावर बोलताना त्यांनी सरकारवर आरोप केला की, हा कायदा म्हणजे सगळ्या जमिनी उद्योगपतींना देण्यासाठीचा डाव आहे. यामध्ये दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कोरटकर प्रकरणावरही त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. सरकारवर प्रेशर आलं म्हणून अटक झाली. सीबीआय आणि ईडीच्या ताब्यात असलेली गाडी बाहेर आली कशी? हे तपासले पाहिजे. ही टोळी खालच्या लेव्हलच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हे सगळं करत आहे. या सर्व प्रकरणांवर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी रोहित पवार यांची जोरदार मागणी आहे.