दिवसभर ऊन, रात्री थंडीचा कडाका; वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:30 IST2025-12-03T18:30:00+5:302025-12-03T18:30:22+5:30
या तीव्र तापमान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून सर्दी, खोकला व श्वसनाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

दिवसभर ऊन, रात्री थंडीचा कडाका; वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढले
पुणे : गेल्या आठ दिवसांपासून पुणे शहरात दिवसा उन्हाचा चटका तर रात्री बोचरी थंडी अशी दुतोंडी हवामानाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. दिवसभर कमाल तापमान साधारण ३० ते ३२ अंशांपर्यंत पोहोचत असून रात्री किमान तापमान ११ ते १३ अंशांवर घसरत आहे. या तीव्र तापमान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून सर्दी, खोकला व श्वसनाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
महापालिकेचे दवाखाने, कमला नेहरू रूग्णालय, ससून रुग्णालय तसेच खाजगी दवाखान्यांच्या ओपीडीमध्ये श्वसनाच्या संसर्गाने त्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि दमा, ॲलर्जी असलेल्या रुग्णांना या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका बसत आहे. लहान मुलांच्या आरोग्यावरही या बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम होत आहे. दिवस-रात्र तापमानातील अचानक बदलामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, श्वसनाचा त्रास यासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रौढांसह वयोवृद्धांमध्येही सर्दी, खोकल्याच्या संसर्ग वाढला आहे. नाक बंद होणे, घसा दुखणे, ॲलर्जिक खोकला, श्वास घेताना दम लागणे, या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
थंडीत घ्यावयाची काळजी :
शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झोप आणि विश्रांती महत्त्वाची आहे. कोमट पाणी पिणे फायदेशीर आहे, घसा खवखवत असल्यास कोमट पाण्याने गुळण्या, दिवसातून २–३ वेळा साधी वाफ घ्यावी. आइस्क्रीम, थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स टाळा. बाहेर जाताना विशेषत: धूळ, प्रदूषण किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा. हात वारंवार स्वच्छ धुणे, घरात व्हेंटिलेशन ठेवा. हळदीचे दूध, मध-आलं-लिंबाचा काढा, व्हिटॅमिन सी युक्त फळे (लिंबू, संत्रे, मोसंबी) भरपूर पाणी याचा अवलंब करा. स्वतःहून अँटिबायोटिक्स घेऊ नका, तीन दिवसांपेक्षा जास्त काळ ताप, श्वास घेण्यास त्रास, सतत खोकला राहिल्यास, लहान मुलांमध्ये श्वास फुलणे, छातीत घरघर, वृद्ध व्यक्तींमध्ये दमा, हृदयाच्या तक्रारी वाढल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत.
शहरातील धुळ प्रदूषणाची गंभीर स्थिती ; यंत्रणांचे दुर्लक्ष :
शहर आणि उपनगरांमध्ये इमारत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यातून उडणारी धुळ नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका बनली आहे. बांधकामस्थळी धुळ दाबण्यासाठी पाणी मारणे, धुळ प्रतिबंधक जाळ्यांचा वापर करणे गरजेचे असताना अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे. याबरोबरच बांधकामातील डेब्रिज, वाळू क्रश सँड वाहतुकीदरम्यान पाणी मारणेख ताडपत्रीचा वापर करणे,
हे नियम असले तरी अंमलबजावणी मात्र शून्य आहे. शहरालगतचे स्टोन क्रशर, प्री-मिक्स प्लांट आणि क्रशिंग युनिट्स सतत धुळीचे ढग उडवत असून संबंधित यंत्रणाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांची नाराजी आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
वाढती थंडी व बदलत्या वातावरणात नागरिकांना विशेष काळजी घ्यावी. तापमानानुसार कपड्यांचा योग्य वापर, कोमट पाणी पिणे, धुळीत मास्क वापरणे लहान मुले व वृद्धांनी थंडीत बाहेर जाणे टाळावे, घरात स्वच्छता व हवा खेळती ठेवणे गरजेचे आहे. वाढत्या व घटत्या तापमानातील तफावतीमुळे श्वसनाच्या आजारांचे प्रमाण वाढत असून नागरिकांना सावधगिरी बाळगावी. - डाॅ. निना बोराडे, आरोग्य प्रमुख, महापालिका
तापमानातील अचानक बदलामुळे वातावरणातील विषाणूंचे प्रकार व प्रमाण बदलले जाते. नवीन विषाणू लहान मुलांना लगेच संसर्ग करू शकतात परंतु लहान मुलांच्या रोगप्रतिकार शक्तीसाठी हे विषाणू नवीन असल्यामुळे विषाणूंना ते आटोक्यात ठेवू शकत नाहीत. घरात आणि शाळेत तापमानातील तफावत जास्त असल्याने संसर्गाचा धोका वाढतो. तो टाळण्यासाठी मुलांना कोमट पाणी पाजणे, थंडीत उबदार कपडे घालणे, धुळीत खेळणे टाळणे आणि आजारी असल्यास योग्य विश्रांती देणे महत्त्वाचे आहे. - डॉ. ललितकुमार धोका, बालरोग तज्ज्ञ