गुलटेकडी फायरिंग प्रकरण : गेम करायला निघाले, पण गोळी लागली दुसऱ्यालाच; नेमकं काय घडलं ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 11:08 IST2026-03-08T11:07:16+5:302026-03-08T11:08:06+5:30
काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलांनी हवेत गोळीबार केला होता.

गुलटेकडी फायरिंग प्रकरण : गेम करायला निघाले, पण गोळी लागली दुसऱ्यालाच; नेमकं काय घडलं ?
पुणे : गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहत येथील रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा पूर्ववैमनस्यातून गेम करायचा होता, परंतु गोळी दुसऱ्यालाच लागल्याचा प्रकार समोर आला आहे. मार्केट यार्डतील वखार महामंडळाकडून गंगाधामकडे जाणाऱ्या रोडवर रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. मोझेस शेकापूरे ऊर्फ मोज्या (वय २२, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्या पाठीत गोळी शिरली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
मीनाताई ठाकरे वसाहतीत बालाजी उमाप, राम उमाप व त्याच्या साथीदार व शेकापुरे टोळीमध्ये वर्चस्व वादातून अनेकदा वाद झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलांनी हवेत गोळीबार केला होता. यावरून बालाजी उमाप आणि अमित शेकापुरे यांच्यात शुक्रवारी दुपारी वादावादी झाली. त्यानंतर अमित शेकापूरे याचा भाऊ मोझेस शेकापुरे व त्याचा मित्र हे दुचाकीवरून शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता वखार महामंडळाकडून गंगाधामकडे जात होते. यावेळी बालाजी उमाप, राम उमाप व त्याचे ४ ते ५ साथीदार दुचाकीवरून आले. त्यांनी शेकापुरे व त्याच्या मित्राला अडविले.
यावेळी उमाप याने गोळीबार केला. ती गोळी शेकापुरे याच्या पाठीत शिरली. तो जागेवरच कोसळला. हे पाहिल्यावर हल्लेखोर पळून गेले. मार्केट यार्ड पोलिसांना शेकापूरे याला रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांना शेकापुरे नाही तर त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला मारायचे होते, मात्र, गोळीबारात शेकापुरे हा जखमी झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित जगताप पुढील तपास करत आहेत.
१२ तासांत आवळल्या आरोपींच्या मुसक्या...
फायरिंगची घटना घडताच पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी पोलिस पथके तयार करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले. १२ तासांच्या आत मार्केटयार्ड पोलिसांनी याप्रकरणातील आरोपी बालाजी उमाप (वय २२, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी), साहील चव्हाण (वय २०), राजू उमाप (वय ५५, रा. आरण्येश्वर, सहकारनगर), शुभम दिलीप पवार (वय २०) आणि आनंद उमाप (वय २२, रा. वडगाव, सिंहगड रोड) या आरोपींना सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारमार्फत माहितीच्या आधारे सापळा रचून ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलिसांच्या पथकाने केली.