खेड तालुक्यातील मंदोशी येथे गॅस स्फोट; घराचे मोठे नुकसान, एक जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 12:58 IST2025-12-14T12:57:56+5:302025-12-14T12:58:28+5:30
मंदोशी येथे घरात गॅस स्फोट; पुतण्या गंभीर जखमी, मोठी दुर्घटना टळली

खेड तालुक्यातील मंदोशी येथे गॅस स्फोट; घराचे मोठे नुकसान, एक जण गंभीर
खेड (पुणे जि. ) - मंदोशी (ता. खेड) येथील शांताबाई सिताराम गोडे यांच्या घरात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास गॅसचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत त्यांचा पुतण्या लहू तुकाराम गोडे गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री थंडीमुळे शांताबाई गोडे, त्यांची सून जयश्री व नातू आरव घराबाहेर बसले होते. याच वेळी घरातून गॅसचा वास येत असल्याचे लक्षात आल्याने चौकशीसाठी लहू गोडे घरात गेले. मात्र, अचानक मोठा स्फोट होऊन घरात आग पसरली.
स्फोटाची तीव्रता इतकी होती की घरातील टी-अँगल असलेल्या छताची फरशी पूर्णपणे फुटली, तसेच वरच्या मजल्यावरील सिमेंट पत्रेही तुटली. वरच्या मजल्यावर दोन भरलेले गॅस सिलेंडर होते; मात्र, सुदैवाने त्यांचा स्फोट झाला नाही. त्या मजल्यावर राहणारे कुटुंब कामानिमित्त कल्याण येथे गेले असल्याने ते अपघातातून बचावले.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्परता दाखवत आगीतून सिलेंडर बाहेर काढले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठ अधिकारी व स्थानिक गॅस एजन्सीला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, ‘शिकालो’ गॅस एजन्सीचे मालक नितीन डांगे यांनी अपघातग्रस्त कुटुंबाला संपूर्ण भरपाई देणार असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.