विजयादशमीच्या दिवशी हवेत गोळीबार; कोरेगाव मुळ येथे दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:41 IST2025-10-04T13:40:12+5:302025-10-04T13:41:13+5:30
आरोपी अजिंक्य कड याने कोणताही शस्त्र परवाना नसताना हवेत गोळी झाडली. गोळीबार करताना तो निष्काळजी व अविचारी पद्धतीने वागल्याचे स्पष्ट झाले

विजयादशमीच्या दिवशी हवेत गोळीबार; कोरेगाव मुळ येथे दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
उरळी कांचन : हवेली तालुक्यातील कोरेगाव मुळ येथे विजयादशमीनिमित्त करण्यात आलेल्या शस्त्र पूजनावेळी एकाने हवेत गोळी झाडल्याची खळबळजनक घटना २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता (बीएनएस), तसेच शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी अटकेत आहे.
फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुमित नंदकुमार वाघ (वय 34, रा. लोणीकाळभोर, सध्या नेमणूक उरुळी कांचन पोलीस स्टेशन) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य बाजीराव कड (वय 28, रा. कोरेगाव मुळ) , जयसिंग वामनराव तांबे उर्फ भोसले (वय 71, रा. कोरेगाव मुळ) या आरोपींना नोटीस देण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अजिंक्य कड याने कोणताही शस्त्र परवाना नसताना हवेत गोळी झाडली. गोळीबार करताना तो निष्काळजी व अविचारी पद्धतीने वागल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे परिसरातील लोकांचे जीव धोक्यात आले होते. विशेष म्हणजे, आरोपी क्रमांक २ जयसिंग तांबे यांनीच अजिंक्यला शस्त्र दिल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तत्काळ कारवाई करत अजिंक्य कड याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर बीएनएस कलम १२५ ३(५), व शस्त्र कायदा ३/२५, ३० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंग तांबे यांना बीएनएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बाजगिरे करत असून, पुढील चौकशी सुरू आहे.