‘सकाळी शाळा’ आदेशाचा फेक स्क्रीनशॉट व्हायरल; पुणे जिल्ह्यात शिक्षकांमध्ये संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:15 IST2026-03-19T16:14:50+5:302026-03-19T16:15:16+5:30
- उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली; जिल्हा परिषदेकडून आदेश नसल्याचे स्पष्ट

‘सकाळी शाळा’ आदेशाचा फेक स्क्रीनशॉट व्हायरल; पुणे जिल्ह्यात शिक्षकांमध्ये संभ्रम
- बी. एम. काळे
जेजुरी : वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी जोर धरत असतानाच, जिल्हा परिषदेकडून आदेश जारी झाल्याचा दावा करणारा कॉम्प्युटर स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिक्षकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
या प्रकरणावर पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण देत संबंधित स्क्रीनशॉट अधिकृत नसून, कार्यालयातून कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले. व्हायरल होत असलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.
दरम्यान, शाळा सकाळी सुरू करण्याबाबत विविध प्राथमिक शिक्षक संघटनांनी प्रशासनाकडे निवेदने दिली होती. मात्र, या पार्श्वभूमीवर एका संघटनेकडून निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न झाल्याने इतर संघटनांनी नाराजी व्यक्त केली. सर्व संघटनांनी एकत्रितपणे मागणी केली असताना, कोणत्याही एका संघटनेने श्रेय घेऊ नये, अशी भावना शिक्षकांमध्ये व्यक्त होत आहे.
या प्रकारामुळे शिक्षकवर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, अपूर्ण व चुकीची माहिती पुढे पाठविल्याने गैरसमज अधिक वाढले आहेत. ही माहिती प्रशासनातूनच बाहेर आली का, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही पुढे येत आहे.
१८ मार्चपासून पुणे शहर व ग्रामीण भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली असताना, शाळांच्या वेळापत्रकाबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. संघटनांमधील श्रेयवादामुळे निर्णय प्रक्रियेत विलंब होत असल्याची चर्चा शिक्षक वर्तुळात रंगत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असताना, समन्वयाऐवजी श्रेयवाद पुढे येणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर स्पष्ट भूमिका जाहीर करावी, तसेच संघटनांनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत एकमताने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तपासाचे संकेत
याबाबत जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डॉ. संजय नाईकडे यांनी सांगितले की, “कार्यालयात क्लार्क टायपिंग करत असताना, कोणीतरी फोटो काढला असावा. हा प्रकार चुकीचा असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितावर कारवाई करण्यात येईल.”