धानेप गावात ज्येष्ठ महिलेवर प्राणघातक हल्ला; आरोपीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 14:13 IST2025-03-23T14:12:43+5:302025-03-23T14:13:26+5:30
हल्ल्यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

धानेप गावात ज्येष्ठ महिलेवर प्राणघातक हल्ला; आरोपीवर गुन्हा दाखल
पानशेत - राजगड तालुक्यातील धानेप गावात एका ज्येष्ठ महिलेवर अमानुष हल्ला झाल्याची घटना घडली आहे. राधाबाई कोंडीबा डोईफोडे (वय ७०) यांच्यावर गावातीलच शंकर अनंता मरळ याने काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना दिनांक २१ मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. हल्ल्यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर २२ मार्च रोजी उशिरा राजगड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
फिर्यादीत राधाबाई डोईफोडे यांनी म्हटले आहे की, शंकर मरळ हा दारू पिऊन आमच्या घरासमोर आला आणि शिवीगाळ करू लागला. त्यानंतर त्याने दारात पडलेल्या लाकडाने माझ्या तोंडावर, हातावर आणि पायावर जबर मारहाण केली. माझे पती मला वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही त्याने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३२४ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.
या घटनेनंतर गावात संतापाची भावना निर्माण झाली आहे. पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी आणि आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मारहाणीनंतरही पोलिसांनी त्वरित कारवाई केली नाही. गावातील पोलीस पाटीलही घटनास्थळी आले नाहीत. त्यामुळे आमच्या कुटुंबाला भीती वाटत आहे. आम्हाला न्याय मिळावा, अशी प्रतिक्रिया पीडित महिलेच्या भाच्याने, विकास खुटेकर यांनी दिली.
पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन खामगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.