ओढ्यातून दररोजचा प्रवास;मेटपिलावरेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात;पुलाच्या उभारणीची ग्रामस्थांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:55 IST2025-08-19T19:54:48+5:302025-08-19T19:55:55+5:30
- हा प्रवास मुलांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. कैलास जोरकर यांनी आपल्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी वेल्हे येथे भाड्याने खोली घेऊन व्यवस्था केली आहे

ओढ्यातून दररोजचा प्रवास;मेटपिलावरेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात;पुलाच्या उभारणीची ग्रामस्थांची मागणी
वेल्हे ( पुणे जि. ) - राजगड तालुक्यातील किल्ले राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या मेटपिलावरे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. येथील जोरकर वस्तीतील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा वाजेघर तसेच माध्यमिक शाळेत शिक्षणासाठी जातात. मात्र पावसाळ्यात शाळेकडे जाणारा मार्ग धोकादायक ठरत असून वाटेत येणाऱ्या ओढ्यातून पूर आलेले पाणी पार करून जावे लागते.
दररोज सकाळ-संध्याकाळ पालक मुलांना सुरक्षितपणे ओढा पार करून देतात. तरीदेखील हा प्रवास मुलांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. कैलास जोरकर यांनी आपल्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी वेल्हे येथे भाड्याने खोली घेऊन व्यवस्था केली आहे, मात्र सर्वांना ते शक्य होत नाही.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे उलटली तरी आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अशा संकटांचा सामना करावा लागत आहे. जोरकर वस्तीसाठी पक्क्या रस्त्याची सोय नसल्यामुळे फक्त विद्यार्थीच नव्हे तर कामगार, शेतकरी, वृद्ध, अपंग आणि आजारी रुग्णांनाही याच ओढ्यातील पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही या ओढ्यावर पूल उभारण्याचे काम झालेले नाही. त्यामुळे तातडीने पुलाची उभारणी करून गावकऱ्यांना सुरक्षित दळणवळणाची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.