उन्हाच्या तडाख्यात इलेक्ट्रिक बस, मेट्रो प्रवासाला नागरिकांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:41 IST2026-04-14T09:40:52+5:302026-04-14T09:41:20+5:30
- उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक प्रवासी एसी बसची पाहताहेत वाट

उन्हाच्या तडाख्यात इलेक्ट्रिक बस, मेट्रो प्रवासाला नागरिकांची पसंती
-अंबादास गवंडी
पुणे : सध्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रवासात होणाऱ्या प्रचंड उकाड्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी पीएमपीच्या वातानुकूलित (एसी) इलेक्ट्रिक बस आणि मेट्रोकडे प्रवाशांचा कल वाढला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून एसी बस आणि मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शिवाय दुपारच्या कडक उन्हापासून बचावासाठी अनेक प्रवासी एसी बसला प्राधान्य देत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानल्या जाणाऱ्या पीएमपीच्या बससेवा पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पीएमआरडीए क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर धावतात. नोकरीसाठी प्रवास करणारे कर्मचारी, महिला आणि विद्यार्थ्यांचा मोठा वर्ग या सेवेवर अवलंबून आहे. पूर्वी डिझेल व सीएनजी बसचे प्रमाण अधिक होते; मात्र गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक बसचा ताफा वाढला असून, उन्हामुळे एसी बसला आता विशेष मागणी वाढली आहे. यंदा मार्चपासूनच उन्हाचा चटका जाणवू लागला होता.
सध्या तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसदरम्यान पोहोचल्याने दुपारच्या वेळेत प्रवास करणे नागरिकांसाठी कठीण बनले आहे. साध्या बसमधून प्रवास करताना उष्णता, घाम, धूळ आणि कर्कश आवाजाचा त्रास सहन करावा लागत असल्याने प्रवासी एसी बसकडे वळत आहेत. काही ठिकाणी एसी बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होत असून, प्रवासी उभे राहूनही प्रवास करण्यास तयार असल्याचे दिसत आहे.
कोणत्या मार्गांवर एसी बससेवा?
पुणे शहरातील प्रमुख भागांमध्ये एसी इलेक्ट्रिक बस धावत आहेत. विशेषतः कात्रज, हडपसर, भेकराइनगर, निगडी, पुणे स्टेशन, वाघोली, माण, बाणेर, लोहगाव आणि हिंजवडी या मार्गांवर या बसची सेवा उपलब्ध आहे. नोकरदार वर्गाला सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी या मार्गांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. शिवाय सध्या उन्हाचा कडाका वाढल्यामुळे या एसी बस दिवसभर भरून जात आहेत.
मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ
शहरात स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवर मेट्रोची सेवा सुरू आहे. गेल्या एक आठवड्यापासून उन्हाचा कडाका वाढला आहे. दुपारच्या सत्रात तर लाहीलाही होत आहे. यामुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या दैनंदिन सरासरी २० हजार प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. इतर वेळेच्या तुलनेत आता उन्हामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रवाशांच्या मेट्रोकडे ओढा वाढला आहे. त्याचा फायदा मेट्रोला होत आहे.
आठ दिवसांतील प्रवाशांची संख्याः
१ एप्रिल - ११ लाख ९ हजार ७७
२ एप्रिल - १० लाख ७५ हजार २००
३ एप्रिल - १० लाख १ हजार ९६४
४ एप्रिल - १० लाख ६० हजार ६९४
५ एप्रिल - ९ लाख ७९ हजार ४७१
६ एप्रिल - ११ लाख ७७ हजार ६५१
७ एप्रिल - ११ लाख ३६ हजार ४७५
८ एप्रिल - ११ लाख १६ हजार ९२९
उन्हामुळे साध्या बसमधून प्रवास करताना डोकेदुखी होते. बसचा आवाजही त्रासदायक असतो. त्यामुळे एसी बस अधिक सोयीस्कर वाटते. सकाळी अकरानंतर उन्हाची तीव्रता वाढते. शिवाजीनगरला नोकरीसाठी जाताना मी एसी बसलाच प्राधान्य देतो. प्रवास आरामदायी होतो आणि घाम, धूळ यांचा त्रास होत नाही. - समाधान माळी, प्रवासी