बीएड, एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रम प्रवेशाच्या सीईटी नोंदणीला सुरुवात;असा असेल वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:23 IST2026-01-09T12:23:14+5:302026-01-09T12:23:39+5:30
- एमपीएड, एमएड, एमसीए, एम. एचएमसीटी, बी. एड आणि ३ वर्षीय एलएलबी या सहा अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीस सुरुवात झाली आहे.

बीएड, एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रम प्रवेशाच्या सीईटी नोंदणीला सुरुवात;असा असेल वेळापत्रक
पुणे : बी. एड. (जनरल व स्पेशल), बी.एड. (इलेक्ट.) आणि ३ वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश नोंदणीस गुरुवारी सुरुवात झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ही प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी कक्षाने दिली. सदर नोंदणी प्रक्रिया २३ जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाइन पार पडणार आहे.
सध्यस्थितीत एमपीएड, एमएड, एमसीए, एम. एचएमसीटी, बी. एड आणि ३ वर्षीय एलएलबी या सहा अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीस सुरुवात झाली आहे. इतर अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीस देखील लवकरच सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सीईटी परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणक आधारित पद्धतीने ऑनलाइन घेतल्या जातील.
मागील वर्षी अर्थात २०२५ च्या बी. एड. सीईटी प्रवेश परीक्षेमध्ये १,१६,५८५ विद्यार्थ्यांनी; तर ३ वर्षीय एलएलबी सीईटी प्रवेश परीक्षेमध्ये ९४,५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
-------
असा असेल वेळापत्रक
सीईटी - प्रारंभ तारीख - अंतिम तारीख - परीक्षेची संभाव्य तारीख
महा. बी.एड. सीईटी - ८ जानेवारी - २३ जानेवारी - ७ ते २९ मार्च २०२६
महा. एलएलबी (३ वर्षीय ) - ८ जानेवारी - २३ जानेवारी - १ ते २ एप्रिल २०२६
-----------
मागील तीन वर्षांत प्रवेश परीक्षेस नोंदणी केलेले विद्यार्थी
प्रवेश परीक्षा - २०२३-२४ : २०२४-२५, २०२५-२६
बी. एड. सीईटी - ७९,९८४ : ७९,०८३ : १,१६,५८५
एलएलबी (३ वर्षे) - ७६,४२५ : ८०,१२५ : ९४,५०६