राहुल गांधींच्या ‘त्या’ भाषणाची सीडी न्यायालयात चाललीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 09:46 IST2025-11-28T09:44:13+5:302025-11-28T09:46:55+5:30
- सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी सरतपासणी व पुरावा नोंदविण्यासाठी मागितली मुदतवाढ; आज पुन्हा सुनावणी

राहुल गांधींच्या ‘त्या’ भाषणाची सीडी न्यायालयात चाललीच नाही
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वादग्रस्त भाषणाची सीडी न्यायालयात सरतपासणीदरम्यान चाललीच नाही. तांत्रिक अडचणींमुळे ही सीडी चालत नसल्याने सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी याप्रकरणी न्यायालयात पुरावा म्हणून सादर केलेल्या दोन सीडी चालविण्यात याव्यात, असा अर्ज केला. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यावर, ॲड. कोल्हटकर यांनी सरतपासणी व पुरावा नोंदविण्यासाठी मुदतवाढ मागितली. त्यास राहुल यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३०९ अंतर्गत तीव्र आक्षेप नोंदविला.
२०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली आहे. पुण्यातील अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयात या याचिकेची सुनावणी सुरू आहे. ॲड. संग्राम कोल्हटकर यांच्याकडून राहुल यांची सरतपासणी घेऊन पुरावा नोंदविला जात आहे. त्या अंतर्गत तक्रारदारांच्या वतीने पुरावा म्हणून कथित वादग्रस्त भाषण असलेली सीडी न्यायालयासमोर सादर करण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही सीडी चालली नाही. त्यावर तक्रारदारांना सरतपासणी व पुरावा नोंदविण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येऊ नये, तातडीने पुरावा पूर्ण करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी ॲड. पवार यांनी केली.
याप्रकरणी, सरतपासणी व पुरावे नोंदविण्यासाठी तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, तक्रारदार त्यांच्या सोयीनुसार टप्प्याटप्प्यात पुरावे सादर करत आहेत. हे राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत पारदर्शकपणे खटला चालविण्याच्या हमीचे उल्लंघन करणारे आहे. तक्रारदार जाणीवपूर्वक कार्यवाही लांबविण्याचा प्रयत्न करत आहे. तक्रारदारांच्या वतीने योग्य पुरावे सादर न करता अनावश्यक दबाव टाकून व न्यायालयासमोर तातडीचे वातावरण निर्माण करून याप्रकरणी समन्स जारी करण्याचा आदेश मिळविला होता, असा दावाही ॲड. मिलिंद पवार यांनी अर्जात केला आहे. या अर्जावर न्यायालयाने सात्यकी सावरकर यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी आज शुक्रवारी (दि. २८) पुढील सुनावणी होणार आहे.