आगामी निवडणुकांत ओबीसी, आरक्षणवाद्यांची सत्ता आणा; ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 17:37 IST2025-10-05T17:32:44+5:302025-10-05T17:37:04+5:30
आगामी निवडणुकांत ओबीसी, आरक्षणवादी समूहांची सत्ता आपल्याला आणायची आहे. त्यासाठी सर्वांनी एकजूट व्हा

आगामी निवडणुकांत ओबीसी, आरक्षणवाद्यांची सत्ता आणा; ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
पुणे : धनगर समाज लढवय्या, इतिहासात त्यांची नोंद राज्यकर्ता अशी आहे. समाजाने आपला इतिहास समजून घेत होळकरांनी दिलेली शिकवण अंगीकारत लढवय्यापण दाखवायला हवे. समाजाची सामाजिक व राजकीय ओळख प्रस्थापित करायला हवी. सत्तालोलुप राजकारण्यांनी धनगरांचा, ओबीसींचा वापर करून सत्ता मिळवली आणि तुम्हाला प्रवाहाबाहेर फेकले. आरक्षण हा उन्नतीचा मार्ग असून, तो सुरक्षित ठेवायचा असेल, तर धनगरांनी सर्व ओबीसी समाजाला एकत्रित करून त्यांचे नेतृत्व करावे. आगामी निवडणुकांत ओबीसी, आरक्षणवादी समूहांची सत्ता आपल्याला आणायची आहे. त्यासाठी सर्वांनी एकजूट व्हा,’’ असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
सकल धनगर समाजाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात ॲड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गणेश हाके, काँग्रेसचे नेते डॉ. यशपाल भिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन गावडे, महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, प्राप्तिकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, संयोजक ॲड. विजय गोफणे, सोमनाथ देवकाते, संतोष शिंदे, यशपाल रायभोगे, ज्ञानेश्वर नरुटे, गणेश सोनटक्के, गणेश दुगाने, धुळदेव टेळे, अनुजा जानकर, शंकर ढेबे, महादेव वाघमोडे, संतोष ढवळे, शालिनी शिंदे आदी उपस्थित होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, इमानदार राज्यकर्ते मिळत नाहीत, समाज केवळ अनुकरण करण्यावर भर देतोय, हे अयोग्य आहे. राज्य करणारा समाज म्हणून धनगरांची ओळख निर्माण व्हायला हवी. धनगर आणि धनखड हे वेगळे असल्याचे सांगून आपला अधिकार हिरावला आहे. १९५० पासून १९९० पर्यंत जवळपास ४० वर्षे आपल्याला आरक्षणापासून वंचित राहावे लागले. मिळालेल्या आरक्षणातही कुणबी-मराठ्यांना घुसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकप्रकारे ओबीसी आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे. त्यामुळे तेलंगण व तामिळनाडूप्रमाणे ओबीसी समाजाने सत्ता काबीज करून २७ टक्के आरक्षण ६०-७० टक्क्यांवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
यावेळी अहिल्यारत्न पुरस्कार वितरण, आरक्षणासाठी उपोषण केलेल्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यात बापूसाहेब शिंदे, रामककिसन रौंदळे, जयश्री वाक्षे, रूपाली जोशी, डॉ. सोमनाथ सलगर, घनश्याम हाके, भारत कवितके, रामभाऊ लांडे, अक्षता ढेकळे, डॉ. स्नेहा सोनकाटे, सुरेखा चौरे-गावडे, विवेक बिडगर, सैनाली गंगाराम उचाळे, धुळाभाऊ कोकरे, दत्ताभाऊ डोंबाळे, मुकुंद कुचेकर, यशोदा नाईकवडे, सुनीता अर्जुन, रेखा धनगर-नरोटे यांना सन्मानित करण्यात आले.
माझे मत आरक्षणवाद्यांना
देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत दलित, ओबीसी, आरक्षण समर्थक आणि मुस्लिम समाज यांचे हक्क धोक्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे माझे मत फक्त ओबीसी, आरक्षणवादी किंवा मुस्लिम उमेदवारांनाच असेल. आपल्याला विचारसरणीपेक्षा हक्क आणि अस्तित्व महत्त्वाचे आहेत. ज्यांनी समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला आहे, त्यांनाच आपला पाठिंबा हवा. आज देशात समानता आणि सामाजिक न्याय टिकवण्यासाठी बहुजन, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाज एकत्र येणे गरजेचे आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.