विजयस्तंभास मानवंदना, वढु येथे छ. संभाजी महाराजांच्या समाधीस भीमसैनिकांचे अभिवादन..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:23 IST2026-01-01T19:22:46+5:302026-01-01T19:23:30+5:30
- कोरेगाव भीमा नजीक पेरणे फाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी दिवसभरात लाखो भीमसैनिकांनी मानवंदना दिली

विजयस्तंभास मानवंदना, वढु येथे छ. संभाजी महाराजांच्या समाधीस भीमसैनिकांचे अभिवादन..!
कोरेगाव भीमा : पेरणे येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणारे अनुयायी वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याने वढुतही मोठ्याप्रमाणावर भीमसागर लोटल्याचे चित्र दिसत होते.
कोरेगाव भीमा नजीक पेरणे फाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी दिवसभरात लाखो भीमसैनिकांनी मानवंदना दिली. येथील मानवंदनेनंतर हे भीमसैनिक कोरेगाव भीमा येथे दाखल झाल्यानंतर येथून पीएमपीएलच्या बसमधून वढु येथे जात होते. १ जानेवारीच्या अनुषंगाने सदर बंदोबस्तात वाढ केली होती. छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधिस्थळ व गोविंद गोपाळ यांचे समाधिस्थळावर बॅरिकेटिंग करण्यात आले होते.
वढुमध्ये आज सकाळपासूनच दोन्ही समाधिस्थळावर अभिवादन व नतमस्तक होण्यासाठी मोठ्याप्रमाणावर भीमअनुयायी उपस्थित होते. यामध्ये तरुणांसह महिलांचाही मोठा सहभाग होता. सकाळपासूनच मानवंदनेसाठी मोठ्याप्रमाणावर बांधवांनी गर्दी केली असून गर्दीच्या नियमनास प्रथम प्राधान्य देण्यात आले असून पूर्ण क्षेत्र सीसीटीव्ही व ड्रोनच्या साहाय्याने निगराणीखाली होते. यावेळी शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड, वढु बुद्रुकचे सरपंच कृष्णा आरगडे, उपसरपंच संगीता सावंत, माजी सरपंच ज्ञानेश्वर आरगडे, माजी उपसरपंच हिरालाल तांबे, ग्रामपंचायत अधिकारी शंकर भाकरे, पोलिस पाटील जयसिंग भंडारे, क्लार्क संतोष शिवले आदी उपस्थित होते.
वढुसाठी जादा बसेस -
१ जानेवारी मानवंदनेसाठी येणारे बांधव वढु बुद्रुक येथील दोन्ही समाधिस्थळांना भेट देण्यासाठी येत असल्याने शिक्रापमर पोलिसांनी कोरेगाव ते वढु व वढु ते चौफुला मार्गावर पीएमपीएलच्या जादा बसेस बरोबरच उपलब्ध करून दिल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी मदत होत होती.