भाविकांच्या सुरक्षिततेसाठी भीमाशंकर मंदिर तीन महिने दर्शनासाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 15:44 IST2026-01-10T15:43:16+5:302026-01-10T15:44:00+5:30
बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी भीमाशंकर मंदिर तीन महिने दर्शनासाठी बंद
भीमाशंकर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक विकासकामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी ९ जानेवारीपासून पुढील तीन महिन्यांसाठी (महाशिवरात्रीचा कालावधी वगळून) मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानने घेतला आहे. भाविकांनी या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांनी केले आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यातील महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष बांधकाम काळातील सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, देवस्थानचे विश्वस्त व स्थानिक दुकानदार यांच्या सर्वानुमते मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिना व महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने, भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी (महाशिवरात्री) या कालावधीत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
सन २०२७ मध्ये नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, लाखो भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या संभाव्य गर्दीचे योग्य व्यवस्थापन, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, सभामंडप व अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २८८.१७ कोटी रुपयांच्या विस्तृत विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. कुंभमेळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याने मंदिर परिसर तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुरुवार (दि. ८) रोजी अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन मंदिर परिसरातील देवस्थानच्या वस्तू व सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षितपणे काढून परिसर कामासाठी खुला करण्यात आला. शुक्रवारी (दि. ९) पहाटे पाच वाजता नित्य पूजा, महाआरती व शंखनाद झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले.
दरम्यान, मंदिर परिसरात भाविक व वाहने येऊ नयेत, यासाठी घोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने डिंभे वाय कॉर्नर, पालखेवाडी फाटा, म्हातारबाचीवाडी, बस स्थानक व मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. मंदिर बंद असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊनही पहाटेपासून मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाल्याने पोलिसांची दमछाक झाली.
नित्य पूजा सुरू राहणार
मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी नित्य पूजा-अर्चा व धार्मिक विधी परंपरेनुसार सुरू राहतील. भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश व प्रत्यक्ष दर्शन उपलब्ध राहणार नाही. बांधकाम यंत्रणा, अधिकृत कर्मचारी व भीमाशंकर ग्रामस्थ वगळता कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास दीर्घकालीन सुरक्षितता व भाविकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्यात येत असून, भाविक व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. - ॲड. सुरेश कौदरे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट
आजपासून मंदिराच्या नूतनीकरण व विकास आराखड्याचे काम सुरू होत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुढील तीन महिने मुख्य मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असून, सर्व रस्त्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. - सागर पवार, सहायक पोलिस निरीक्षक, घोडेगाव पोलिस स्टेशन