कांद्याच्या दरात वर्षभर वाढ न झाल्याने बळीराजा चिंतेत..! कांदा चाळीत सडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घुसमट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:53 IST2025-12-09T13:53:17+5:302025-12-09T13:53:49+5:30
- सध्या कांद्याला १० ते १७ रुपये प्रतिकिलो एवढाच दर मिळतोय : उत्तम प्रतीच्या मालाला कमी दर मिळणे शेतकऱ्यांसाठी निराशाजनक

कांद्याच्या दरात वर्षभर वाढ न झाल्याने बळीराजा चिंतेत..! कांदा चाळीत सडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घुसमट
ओतूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी, गेल्या वर्षभरात भाव स्थिर राहिल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या कांद्याला केवळ १० ते १७ रुपये प्रति किलो एवढाच दर मिळत आहे. उत्तम प्रतीचा माल असूनही एवढा कमी दर मिळणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत निराशाजनक आहे. खत, मजुरी, पाणी, वाहतूक, प्रक्रिया व साठवणूक यांसारख्या सर्व बाबतींत वाढलेला खर्च पाहता, सध्या मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
गेल्या वर्षी दर वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र, दीर्घकाळ साठवणुकीमुळे अर्ध्याहून अधिक कांदा गुदमरून सडला. त्यामुळे आता नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी दरात कांदा विकावे लागत आहे. वर्षभराच्या कष्टाचे चीज होईल, अशी अपेक्षा मोडल्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांची नाराजी फक्त कांदापुरती मर्यादित नाही, तर सोयाबीनसारख्या इतर पिकांनाही योग्य दर मिळत नाहीत.
कांद्याचे दरही वर्षभर २० रुपयांच्या पुढे गेलेले नाहीत. या दरांत उतार होऊन ५ रुपयांपासून १४ रुपयांपर्यंत सरासरी होत आहे. काही शेतकऱ्यांनी माल चाळीत साठवून ठेवला, तर अनेकांनी दर वाढतील या आशेवर विक्री टाळली. मात्र, या प्रतीक्षेचा काही फायदा झाला नसल्याने आता मिळेल त्या दरात उरलेला व सुरलेला माल विकण्याशिवाय पर्याय नाही.
काही शेतकरी सडलेल्या किंवा विकल्या न गेलेल्या कांद्याचा बियाण्यासाठी वापर करण्याचा विचार करत आहेत, पण संपूर्ण माल बियाणे म्हणून विकता येत नाही. त्यामुळे उपलब्ध माल कमी भावात विकण्यास शेतकरी बाध्य झाले आहेत. सद्यस्थितीत नवीन कांद्याचा हंगाम सुरू असल्यामुळे कांदा रोप, खते, औषधे, मजुरी आणि सिंचनासाठी लागणारी आर्थिक तरतूद करणे शेतकऱ्यांसाठी अधिकच कठीण झाली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, आम्हाला कर्ज उपलब्ध होते म्हणून आम्ही नफा कमावतो, हे शासनाचे गणित चुकीचे आहे. प्रत्यक्ष शेती करताना येणाऱ्या अडचणी, खर्च, बाजारभाव आणि हवामानातील अस्थिरता याकडे कुणाचेच लक्ष नाही. कांदा आणि सोयाबीन या दोन महत्त्वाच्या पिकांच्या दरात योग्य वाढ न झाल्यास शेतकरी कसा तग धरेल, असा सवाल शेतकरीवर्गातून उपस्थित होत आहे.
दरवाढीची न्याय मागणी शासनाने तातडीने लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सातत्याने होत आहे. शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव स्थिर राहणे हे बळीराजासाठी सर्वात मोठी चिंता ठरले आहे. योग्य दर मिळाल्यासच शेतकरी सावरू शकतो, अन्यथा परिस्थिती अधिकच गंभीर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
आधुनिक जगात कांदा–सोयाबीनसारखी कोणतीही पिके घेतली, तरी शेतकरी वेड्यात निघतोय, नव्हे तर त्याला वेड्यात काढले जातेय, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण, शेतकऱ्याकडे असलेल्या मालाला बाजारभाव नाही आणि जे माल त्याच्याकडे नाही त्याला सोन्याचा भाव आहे. सरकार आणि व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्याचे चित्र हे सर्वत्र दिसून येते. - शिवशंकर घोलप, कांदा उत्पादक शेतकरी