आंबाडखिंड घाटात दरड कोसळली; भोर-मांढरदेवी रस्ता तातडीने खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:02 IST2025-08-19T19:02:45+5:302025-08-19T19:02:59+5:30
अतिवृष्टीमुळे घाटातील डोंगर उतारावरील माती व दगड घसरण्याची जोखीम सतत वाढलेली असून याचा परिणाम म्हणून दरडी कोसळत आहेत

आंबाडखिंड घाटात दरड कोसळली; भोर-मांढरदेवी रस्ता तातडीने खुला
भोर : भोर-मांढरदेवी रस्त्यावरील आंबाडखिंड घाटात दरड कोसळल्याने रस्ता काही वेळेस वाहतुकीस बंद होता. घाटातील वरवडीच्या वळणावर पहाटे अचानक दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कार्यवाही करून जवळपास एका तासाच्या आत रस्त्यावरचा राडारोडा बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
अतिवृष्टीमुळे घाटातील डोंगर उतारावरील माती व दगड घसरण्याची जोखीम सतत वाढलेली असून याचा परिणाम म्हणून दरडी कोसळत आहेत. त्यामुळे घाटातून जाताना वाहनचालकांनी विशेष दक्षता ठेवावी, असे आवाहन शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी केले आहे. तालुक्यातील सतत चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर दगड-माती घसरण्याची शक्यता कायम आहे.
भोर ते मांढरदेवी या मार्गावर सिमेंट रस्त्याचे काम झाले असून, अनेक वेळा या रस्त्यावर वाहनांनी वेगाने धाव घेतल्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. म्हणूनच, उपअभियंता राजेसाहेब आगळे यांनी वाहनस्वारांना वेग कमी करून, सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्परतेमुळे आणि जेसीपीच्या मदतीने वेळेत मदत मिळाल्याने रस्ता लवकर खुला होऊ शकला आणि वाहतूक सुरळीत झाली आहे.