केडगाव निबंधक कार्यालयात दीड कोटीचे मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप; चौकशीसाठी विधान भवनासमोर उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:47 IST2026-03-13T17:46:20+5:302026-03-13T17:47:15+5:30
या दस्तासाठी एकूण सुमारे दोन कोटी १८ लाख रुपये मुद्रांक शुल्क अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ६८ लाख ९५ हजार रुपये भरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

केडगाव निबंधक कार्यालयात दीड कोटीचे मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप; चौकशीसाठी विधान भवनासमोर उपोषण
केडगाव : मुळशी तालुक्यातील जमिनीच्या खरेदीखताची नोंदणी केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात करताना सुमारे दीड कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडविल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पुणे येथील विधान भवनासमोर सोमवार (दि. ९) पासून उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकाईवाडी (ता. मुळशी) येथील जमिनीचा दस्त क्रमांक ४८६१/२०२५ हा २५ ऑगस्ट २०२५ रोजी केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आला. या दस्तासाठी एकूण सुमारे दोन कोटी १८ लाख रुपये मुद्रांक शुल्क अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ६८ लाख ९५ हजार रुपये भरल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
दौंड येथील वकील श्रीनाथ वेताळ यांनी या प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. मात्र, याबाबत समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच त्यांनी पुणे येथील विधान भवनासमोर उपोषण सुरू करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
वेताळ यांनी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, हा दस्त नोंदविण्यासाठी एका अधिकाऱ्याची विशेषतः एका दिवसासाठी केडगाव येथे नेमणूक करण्यात आली होती. दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या प्रभारी अधिकाऱ्याची पुन्हा बदली करण्यात आली. त्यामुळे या व्यवहाराबाबत शंका निर्माण झाली असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.