मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ; १० ते १५ हजार मतदार 'इधर-उधर' चा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:31 IST2025-11-26T12:31:04+5:302025-11-26T12:31:16+5:30
प्रभाग ८ मधील मध्यभागातील तीन हजारांहून अधिक नावे प्रभाग ७ मध्ये टाकण्यात आली असून, प्रभाग ७ मधील नावे १२ व्या प्रभागात गेल्याचेही उघड झाले आहे.

मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ; १० ते १५ हजार मतदार 'इधर-उधर' चा आरोप
बाणेर :पुणे महापालिका निवडणुकांसाठी २० नोव्हेंबरला जारी करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. प्रभाग क्रमांक ७, ८ आणि ९ मधील अंदाजे १० ते १५ हजार मतदारांची नाते चुकीच्या प्रभागात टाकल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सूस-बाणेर-पाषाण (प्रभाग १) आणि औंध-बोपोडी (प्रभाग ८) परिसरातील अनेकांची नावे एकमेकांच्या प्रभागात दिसत असून, काही बाहेरील प्रभागातील नावेही ८ व ९ मध्ये आल्याचे निष्पन्न झाले आहे बाणेर-औंध सीमावर्ती भागातील मतदारांची नावे प्रभाग ८ मध्ये, तर पाषाण परिसरातील शेकडो नावे थेट प्रभाग ७ मध्ये टाकल्याचे निदर्शनास आले. इंदिरा वसाहत, गणेशखिंड हा भाग प्रभाग ७ मध्ये असूनही, येथील तब्बल ८०० ते ९०० मतदारांची नावे प्रभाग ९ मध्ये दिसून आली आहेत.तसेच औंधमधील सानेवाडी आणि शिवाजीनगर मतदारसंघातीलही अनेक नावे चुकीच्या प्रभागात दाखल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून हरकती व सूचना महापालिकेकडे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले असताना, अधिकाऱ्यांनी आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये सेक्शन चार्ट देताना चुकीची नोंद झाल्याचे सांगत जबाब राज्य निवडणूक आयोगावर ढकलला आहे. निर्दोष मतदार यादी तयार करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असून, या चुकीमुळे इच्छुक उमेदवारांपुढे पेच आहे.
अहिल्यानगरमधील नावे
धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रभाग ८ मधील यादीत, अहिल्यानगर जिल्ह्यातील काही नावे आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रभाग ८ मधील मध्यभागातील तीन हजारांहून अधिक नावे प्रभाग ७ मध्ये टाकण्यात आली असून, प्रभाग ७ मधील नावे १२ व्या प्रभागात गेल्याचेही उघड झाले आहे.
तीन लाख दुबार नावांची वर्तवली शक्यता
तीन लाख दुबार नावे असल्याची शक्यता, बीएलओंकडून तपासणी न झाल्याचा आरोप आणि फॉर्म क्रमांक ६ व ८ ची योग्य अंमलबजावणी न झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. मतदान हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून, चुकीच्या प्रभागात नावे नोंदवल्याने मतदानापासून वंचित ठेवणे अमान्य असल्याचे केसकर यांनी म्हटले.