कृषिमंत्रांच्या राजीनाम्यावर अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 20:07 IST2025-07-25T20:00:46+5:302025-07-25T20:07:05+5:30
अजित पवार म्हणाले, विजय घाडगे यांनी आज भेट घेतली. मारहाणीचं कोणतंही कारण नव्हतं, जे झालं ते चुकीचं आहे. ज्यांनी मारहाण केली, त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं असून, पक्षाच्या पदावरून मुक्त केलं आहे.

कृषिमंत्रांच्या राजीनाम्यावर अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेले छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. यावर अजित पवार यांनी घाडगे यांना मंगळवारपर्यंत (दि. २९) थांबण्यास सांगितले असून, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, विजय घाडगे यांनी आज भेट घेतली. मारहाणीचं कोणतंही कारण नव्हतं, जे झालं ते चुकीचं आहे. ज्यांनी मारहाण केली, त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं असून, पक्षाच्या पदावरून मुक्त केलं आहे. पोलिसांना योग्य कारवाईचे निर्देश दिले आहेत. माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करून मंगळवारी अंतिम निर्णय घेऊ.”
काय आहे प्रकरण?
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत पत्ते उधळले. यानंतर राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली.
या घटनेनंतर अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षाच्या युवा आघाडीचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला. चव्हाण यांनी पोलिसांसमोर हजर होत चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री रस्त्यावर उतरत अजित पवार यांचे बॅनर फाडले आणि जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी संवेदनशील भागात गस्त वाढवली असून, कोणीही कायदा हातात घेऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.