मुबलक पाऊस, तरीही तहानलेली गावे; भीमा नदीचे पात्र कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:49 IST2026-03-25T18:48:53+5:302026-03-25T18:49:19+5:30

- धरणे परिसरातच, पण पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती; शेतकरी-ग्रामस्थांची आवर्तन थांबविण्याची मागणी

pune news abundant rains, yet thirsty villages; Bhima riverbed dry | मुबलक पाऊस, तरीही तहानलेली गावे; भीमा नदीचे पात्र कोरडे

मुबलक पाऊस, तरीही तहानलेली गावे; भीमा नदीचे पात्र कोरडे

डेहणे : खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागातील पाणीटंचाई तेथील वास्तव अधोरेखित करीत आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेल्या या परिसरात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो; मात्र, उन्हाळा आला की पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी भटकंती करावी लागते. चासकमान आणि कळमोडी ही धरणे या भागात असूनही स्थानिकांना त्याचा लाभ होत नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

धरण उभारणीसाठी अनेक ग्रामस्थांनी आपल्या शेत जमिनी दिल्या. या धरणांमुळे परिसरात हरितक्रांती घडेल, अशी अपेक्षा होती; मात्र, आज परिस्थिती अशी आहे की, शेतीसाठी सोडाच पण पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण झाले आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने खरोशी, डेहणे, शेंदुर्ली, वांजाळे, धुवोली, शिरगाव, टोकावडे या नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आव्हाट गाव धरणालगत असले तरी बुरुडवाडी, भागीतवाडी, भगतवाडी, तरपाडेवाडी तसेच कारकुडी, उगलेवाडी, येलवळी, धामणगाव, नायफड येथील अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे.

भीमा नदीकाठावरील शेतांतील हिरवीगार पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. काही शेतकरी नदीतील उरलेल्या डोहांमधून आणि झऱ्यांमधून पाणी आणून पिके वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. भीमा नदीच्या पाण्यावर दौंड आणि शिरूर तालुक्यातील अनेक बंधारे भरून वाहत असताना, धरणासाठी जमीन दिलेल्या पश्चिम भागातील गावे मात्र तहानलेलीच असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

नदीची पाणीपातळी तळाला गेल्याने कृषिपंप नदीच्या मध्यभागी असतानाही उपयोग होत नाही. सलग आवर्तन सुरू ठेवल्याने नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. आवर्तन थांबवून शिल्लक पाणी स्थानिकांसाठी राखून ठेवावे, अशी मागणी या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून रब्बी हंगाम पाण्याअभावी वाया जात आहे. विहिरी, कूपनलिका आटल्या असून, अनेक गावे टँकरच्या निकषातही बसत नसल्याने पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली आहे. माणसांनाच पिण्याचे पाणी मिळत नाही तर जनावरांचे काय, असा प्रश्न दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. चाऱ्याअभावी आणि पाण्याअभावी जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे.

भूमिगत बंधारे कागदावरच

पश्चिम भागातील आदिवासी पट्ट्यात भीमा नदीवर किमान नऊ ठिकाणी बंधारे उभारता येऊ शकतात. कृष्णा खोरे लवादाच्या नियमांनुसार हे काम शक्य असल्याचे सांगितले जाते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव दिल्याचे अनेक वर्षे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही.

कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारल्यास पावसाळ्यानंतरही सहा महिन्यांपर्यंत पाणी साठवता येऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय होण्यासाठी या बंधाऱ्यांसाठी जनमताचा रेटा आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Web Title : भरपूर बारिश, फिर भी प्यासे गांव: भीमा नदी का तल सूखा।

Web Summary : भारी बारिश और बांधों के बावजूद, खेड़ के गांवों में पानी की भारी कमी है। भीमा नदी का तल सूख गया है, जिससे पीने के पानी और कृषि पर असर पड़ा है। निवासियों ने पानी के भंडार की मांग की और संकट के लिए लगातार सिंचाई को जिम्मेदार ठहराया। विलंबित बांध परियोजनाएं समस्या को बढ़ा रही हैं।

Web Title : Abundant Rain, Thirsty Villages: Bhima Riverbed Runs Dry.

Web Summary : Despite heavy rainfall and dams, villages in Khed face severe water scarcity. The Bhima riverbed is dry, impacting drinking water and agriculture. Residents demand water reserves and blame continuous irrigation for the crisis. Delayed dam projects exacerbate the issue.