शहरात १३ तास सुरू होते पोलिसांचे थरारक मॉकड्रिल;नागरिकांचा उडाला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:45 IST2025-10-04T14:45:12+5:302025-10-04T14:45:26+5:30
- फर्ग्युसन रोड, विमानतळ, दगडूशेठ गणपती, विश्रांतवाडी परिसरात दहशतवादी हल्ल्याचा सराव,

शहरात १३ तास सुरू होते पोलिसांचे थरारक मॉकड्रिल;नागरिकांचा उडाला गोंधळ
पुणे : शहरातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कॅम्पमधील एम. जी. रोड, विमानतळ आणि विश्रांतवाडीतील आर. ॲण्ड डी. ई. परिसरात शुक्रवारी अचानक मोठा थरार अनुभवायला मिळाला. कुठे गर्दीत बॉम्बस्फोटाचा प्रसंग उभा राहिला तर कुठे बंदी बनवलेल्या शास्त्रज्ञांची सुटका करण्यासाठी पुणेपोलिस, फोर्स वन आणि एनएसजीच्या पथकांची धावाधाव सुरू होती. एवढ्यावरच न थांबता विमान हायजॅकची प्रत्यक्ष मांडणी करून एनएसजीच्या पथकासह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांना सतर्क करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या या मॉकड्रिलमुळे पुणेकरांना थरारक अनुभव आला.
राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची जाणीव ठेवून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी हा सराव आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार फर्ग्युसन रोडवर गर्दीच्या मध्यभागी तसेच एम. जी. रोड येथे बॉम्बस्फोटाचा प्रसंग दाखवण्यात आला तर विश्रांतवाडीतील आर. ॲण्ड डी. ई. येथील शास्त्रज्ञांना बंदी बनवण्यात आले. सायंकाळी विमानतळावर एक विमान हायजॅक करून त्यातील प्रवाशांना ओलीस धरण्यात आले. याशिवाय रात्री उशिरा दगडूशेठ मंदिर परिसरातही आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिस व आपत्कालीन यंत्रणा तातडीने दाखल झाल्या. घटनास्थळ बंदिस्त करून संशयितांना ताब्यात घेणे, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे, जखमींना मदत पोहोचवणे अशी शृंखलाबद्ध कारवाई प्रत्यक्ष राबवण्यात आली. दरम्यान, या घटनांची पूर्वकल्पना नसल्याने नागरिक गोंधळले होते. मात्र, लगेच हे मॉक ड्रिल असल्याचे समजताच अनेकांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली. काही ठिकाणी वाहतूक थोडा वेळ विस्कळीत झाली होती. तरीही पाहणाऱ्यांनी पोलिस आणि सुरक्षा दलांच्या तडफदार कारवाईचे कौतुक केले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्यासह विविध झोनमधील उपायुक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम केले.
...‘रिस्पॉन्स टाईम’ची नोंद...
आपत्कालीन प्रसंग घडल्यास पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा किती वेळात घटनास्थळी पोहोचतात आणि मदतकार्य सुरू करतात, याचा अभ्यास करण्यात आला. स्थानिक पोलिसांसह विविध यंत्रणांना दाखल होण्यासाठी लागलेल्या रिस्पॉन्स टाईमची नोंद या माध्यमातून घेण्यात आली. प्रत्येक टप्प्यातील वेळेची नोंद घेऊन यंत्रणांमधील समन्वयाची चाचणीही करण्यात आली.
पहाटेपर्यंत सुरू होते मॉकड्रिल..
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेले मॉकड्रिल शहरातील विविध ७ ते ८ ठिकाणी शनिवारी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होते. या मॉकड्रिल साठी एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी ग्रुप) चे एक पथक मुंबईहून तर एक पथक विशेष विमानाने पुणे विमानतळावर दाखल झाले होते. यासह फोर्स वन, शहरातील क्युआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम) चे २ पथके व पुणे पोलिस दलातील शेकडो अधिकारी-कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग होता. एनएसजीचे २५० कमांडो, फोर्स वन चे ८० कमांडो शहरात दाखल झाले होते.