चिंताजनक..! राज्यात आढळले ४,९४२ नवे कुष्ठरुग्ण; सर्वेक्षणात ५ लाखांहून अधिक संशयितांपैकी एक टक्का बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:46 IST2025-12-03T18:46:32+5:302025-12-03T18:46:48+5:30
राज्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग निर्मूलनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली.

चिंताजनक..! राज्यात आढळले ४,९४२ नवे कुष्ठरुग्ण; सर्वेक्षणात ५ लाखांहून अधिक संशयितांपैकी एक टक्का बाधित
पुणे : राज्यात सुरू असलेल्या कुष्ठरूग्ण शोध मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सुमारे ५ लाखांहून अधिक संशयितांच्या तपासण्यांमधून केवळ १.१३ टक्के रुग्णांमध्ये कुष्ठरोगाचे निदान झाले आहे. राज्यात एकूण ४,९४२ नवे कुष्ठरुग्ण निदान झाले असून २०२७ पर्यंत ‘शून्य कुष्ठरोग प्रसार’ साध्य करण्याच्या उद्दिष्टाकडे मोहीमेची वाटचाल असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
राज्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग निर्मूलनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गेल्या पाच वर्षांपासून ही मोहीम सातत्याने राबविली जात असून यंदा सर्व जिल्ह्यांत अधिक व्यापक आणि लक्ष्यित पद्धतीने घराघरांत जाऊन तपासण्या करण्यात आल्या. एकूण ८.६६ कोटी लोकसंख्या या सर्वेक्षणाच्या कक्षेत असून १.७३ कोटी घरांना प्रत्यक्ष भेटींद्वारे तपासणी करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील १०० टक्के आणि शहरी भागातील ३० टक्के जोखीमग्रस्त वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. राज्यातील ६५,८३२ पथके आणि १३,१६६ पर्यवेक्षकांनी सलग १४ दिवस घराघरांत जाऊन तपासण्या केल्या. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. मुख्य सचिव डॉ. निपुण विनायक यांनी सर्व जिल्ह्यांना या मोहिमेबाबत सखोल सूचना देत तपासण्या अधिक गतीने करण्याच्या सुचना केल्या आहेत.
------
१४ दिवसात ९६.८ टक्के लोकसंख्येची तपासणी पूर्ण :
२ डिसेंबरपर्यंत राज्यातील ८३१.४९ लाख लोकांची तपासणी पूर्ण झाली असून हे अपेक्षित लोकसंख्येच्या ९६.८ टक्के आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नागपूर, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांनी १०० टक्क्यांपेक्षा जास्त तपासणी केली आहे. पालघर (९९.७टक्के), सोलापूर (९९.४ टक्के) व नंदुरबार (९८.८ टक्के) यांनीही उल्लेखनीय प्रगती दर्शवली आहे.
---
५ लाखांहून अधिक संशयित रुग्ण ; तपासणी पूर्ण ८५.९ टक्के :
एकूण लोकसंख्येच्या ०.५ टक्के प्रमाणे ४.१५ लाख संशयित अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात ५,०९,६५९ संशयित रुग्ण आढळले, हे अपेक्षेपेक्षा तब्बल १२२ टक्के अधिक आहे. यापैकी ४,३७,५५७ संशयितांची तपासणी पूर्ण झाली असून हे प्रमाण ८५.९ टक्के आहे. गोंदिया (१९८टक्के), वर्धा (१८९टक्के), नागपूर (२१९टक्के) आणि गडचिरोली (२२९टक्के) या जिल्ह्यांत अपेक्षेपेक्षा दुपटीहून अधिक संशयित रुग्ण नोंदले गेले.
४,९४२ नव्या रुग्णांचे निदान; बहुतांश जिल्ह्यांत कमी प्रमाण :
तपासलेल्या संशयितांपैकी १.१३ टक्के म्हणजेच ४,९४२ रुग्णांत कुष्ठरोग निदान झाले आहे. सात जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्ण आढळले असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सर्वात कमी प्रकरणे आढळली आहेत.
सर्वाधिक रूग्ण आढळलेले जिल्हे - कुष्ठरूग्ण संख्या
चंद्रपूर – ४०५ (३.५५ टक्के)
सातारा – ३०८ (१.७९ टक्के)
नागपूर – २९१ (०.९७ टक्के)
गडचिरोली – २८६ (२.९९ टक्के)
यवतमाळ – २५८ (२.०६ टक्के)
पालघर – २४३ (१.४७टक्के)
अमरावती – २३९ (१.८६टक्के)
---
राज्याचा निष्कर्ष (दि. २ डिसेंबर पर्यंत)
तपासलेली लोकसंख्या : ८३१.४९ लाख (९६.८ टक्के)
संशयित : ५,०९,६५९
तपासलेले संशयित : ४,३७,५५७ (८५.९टक्के)
निदान झालेले रुग्ण : ४,९४२
कुष्ठरोगाविषयी समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी रॅली, पथनाट्य, ध्वनीप्रसार, पोस्टर्स, शाळांमध्ये जनजागृती, सामाजिक माध्यमांवरील संदेश अशा अनेक उपक्रमांद्वारे व्यापक प्रचार केला जात आहे. कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. - डॉ. राजरत्न वाघमारे, सहसंचालक, क्षयरोग व कुष्ठरोग विभाग.
संशयित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवले जाते. सात दिवसांत वैद्यकीय तपासणी करून निदान निश्चित झाल्यास रुग्णांना त्वरित औषधोपचार सुरू केले जातात. लवकर निदान झाल्यास अपंगत्व टाळणे शक्य आहे. पुढील काही दिवसांत १०० टक्के तपासणी पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे २०२७ पर्यंत ‘शून्य कुष्ठरोग प्रसार’ साध्य होईल. - डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, क्षयरोग व कुष्ठरोग विभाग.