राज्यात १०८ टक्के पाऊस, सप्टेंबरमध्ये सरासरीच्या दीडपट नोंद, संभाजीनगर विभाग आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 12:16 IST2025-10-02T12:15:30+5:302025-10-02T12:16:27+5:30
चारही महिन्यांच्या सरासरीचा विचार करता संभाजीनगर विभागात १३९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात १०८ टक्के पाऊस, सप्टेंबरमध्ये सरासरीच्या दीडपट नोंद, संभाजीनगर विभाग आघाडीवर
पुणे : राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पावसाळा गृहीत धरला जातो. त्यानुसार सरासरी १००४ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात या चार महिन्यांमध्ये १०९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या हे प्रमाण १०८ टक्के इतके आहे. सर्वाधिक १६४ टक्के पाऊस सप्टेंबर महिन्यात झाला असून गेल्या वर्षी याच महिन्यात ११६ टक्के पाऊस झाला होता. ऑगस्ट व सप्टेंबरमधील पावसामुळे राज्यातील सुमारे ६० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. चारही महिन्यांच्या सरासरीचा विचार करता संभाजीनगर विभागात १३९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा १०४ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. राज्यात जून ते सप्टेंबर या काळात १००४ मिलिमीटर पावसाची सरासरी नोंद केली जाते. प्रत्यक्षात १०९१ अर्थात १०८ टक्के पाऊस झाला आहे. त्यानुसार प्रत्यक्षात पाऊस चार टक्के अधिक झाला आहे. जून महिन्यात २०७ मिलिमीटर (९९.८ टक्के), जुलै २९०.८ मिलिमीटर (८७.९ टक्के), ऑगस्टमध्ये २९८.२ मिलिमीटर (१०४.३ टक्के) तर सप्टेंबर महिन्यात २९५.३ मिलिमीटर (१६४.३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात सरासरी १८० मिलिमीटर पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात यंदा २९५ मिलिमीटर अर्थात १६४.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच ११६ टक्के पाऊस पडला होता. यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण सरासरीच्या दुपटीहून अधिक असल्याने त्याचा फटका काढणीला आलेल्या पिकांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे ६० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
विभागनिहाय विचार करता राज्यात सर्वाधिक पाऊस संभाजीनगर विभागात ९४७.५ मिलिमीटर अर्थात १३९.४४ टक्के झाला आहे. त्या खालोखाल अमरावतीत ११५, नागपूरमध्ये ११०, नाशिकमध्ये ९८, कोकणात ९६ तर सर्वांत कमी पुणे विभागात ८७ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्हानिहाय विचार करता बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सरासरीच्या १६१ टक्के पाऊस पडला आहे. तर सर्वांत कमी ७१ टक्के पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात नोंदविण्यात आला आहे.
पावसाची मिमीमध्ये आकडेवारी
महिना सरासरी--प्रत्यक्ष टक्के--गतवर्षी टक्के
जून २०८--२०७--९९.८--१०७
जुलै ३३१--२९०.८--८७.९--१४६
ऑगस्ट २८६--२९८.२--१०४.३--९१
सप्टेंबर १८०--२९५--१६४.३--११६
एकूण राज्य १००४--१०९१--१०८--११६