‘छत्रपती’वर श्री जय भवानी माता पॅनलचा झेंडा;इंदापूरमध्ये पवार-भरणे-जाचक यांचे नवे पर्व सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 19:34 IST2025-05-20T19:34:17+5:302025-05-20T19:34:51+5:30
तब्बल २१ तास चालली मतमोजणी; श्री छत्रपती बचाव पॅनलला एकही जागा जिंकणे झाले नाही शक्य; फटाक्यांची आतषबाजी अन् गुलालाच्या उधळणीत परिसर न्याहळून निघाला

‘छत्रपती’वर श्री जय भवानी माता पॅनलचा झेंडा;इंदापूरमध्ये पवार-भरणे-जाचक यांचे नवे पर्व सुरू
बारामती : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जय भवानी माता पॅनलच्या सर्व उमेदवारांनी बाजी मारली. या पॅनलच्या सर्व २१ उमेदवारांनी मोठ्या मतांच्या फरकाने विजय मिळवला. सोमवारी बारामतीच्या प्रशासन भवन येथे सोमवारी (दि. १९) सकाळी ९ वाजता सुरू झालेली मतमोजणी मंगळवारी (दि. २०) पहाटे ५.३० च्या सुमारास पूर्ण झाली. जवळपास २१ तास मतमोजणी सुरू होती. या निवडणुकीत विरोधी श्री छत्रपती बचाव पॅनलला एकही जागा जिंकणे शक्य झाले नाही. सहकारातील या निकालाने इंदापूर तालुक्यात अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांच्यासह पृथ्वीराज जाचक यांचे नवीन राजकीय पर्व सुरू झाले आहे.
कोरोनासह कारखान्याच्या सभासदत्वाच्या मुद्द्यावर दीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर जवळपास दहा वर्षांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. यामध्ये सुरुवातीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोट्यवधींचे कर्ज असणाऱ्या ‘छत्रपती’ला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी अनेक वर्ष राजकीय विरोधक असणाऱ्या पृथ्वीराज जाचक यांच्यासमवेत हातमिळवणी करत रणनीती आखली. यामध्ये निवडणूक समन्वयक किरण गुजर यांनी महत्त्वाची भूमिका बाजवली. निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. पक्षफुटीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच बालेकिल्ल्यात ही सहकाराच्या वर्चस्वाची पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. यावर आजच्या निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे.
‘छत्रपती’चा अपेक्षित कारभार झाला नसल्याने ही वेळ आल्याची कबुलीदेखील उपमुख्यमंत्री पवार यांनी भरसभेत देत विरोधकांची हवा काढून घेतली. उमेदवारी देताना जुन्या संचालक मंडळातील एकाही चेहऱ्याला संधी न देता सर्व नवीन चेहऱ्यांना नव्याने संधी देण्याची रणनीती पवार यांनी आखली. त्यामुळे काही प्रमाणात नाराजीचे वातावरण होते. मात्र, पवार, भरणे यांनी यामध्ये लक्ष घातल्याने नाराजी ओसरली. तसेच उमेदवारी न मिळाल्याने शरद पवार गटाने या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. हर्षवर्धन पाटील यांनीदेखील सर्वपक्षीय पॅनलला पाठिंबा व्यक्त केला. ५३ गावांमधील शेतकरी, कामगारांच्या प्रपंचासाठी आशीर्वाद द्या, अशी भावनिक साद उपमुख्यमंत्री पवार यांनी सभासदांना घातली. त्याला प्रतिसाद देत सभासदांनी श्री जय भवानीमाता पॅनलला भरभरून मतदान केले. निकालाचा कल जाहीर झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर जय भवानीमाता पॅनलने फटाक्यांची आतषबाजी करीत, गुलालाची उधळण करीत आनंद साजरा केला. यावेळी तिन्ही नेत्यांंच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.
बचाव पॅनलकडून १४ जणांनीच दिली लढत
सर्वपक्षीय श्री जय भवानीमाता पॅनलसाठी मुलाखत देऊनही उमेदवारी न मिळाल्याने काहींनी छत्रपती बचाव पॅनलचे तानाजीराव थोरात यांच्याशी हातमिळवणी केली. यामध्ये ‘छत्रपती’चे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांचे चिरंजीव करणसिंह घोलप, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर निंबाळकर यांचे पुतणे संग्रामसिंह निंबाळकर यांच्यासह अन्य १५ जणांचा समावेश होता. त्यानंतर जय भवानीमाता पॅनलच्या २१ उमेदवारांच्या विरोधात सुरुवातीला विरोधी श्री छत्रपती बचाव पॅनलमधून १६ जणांनी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, या पॅनलच्या सत्यजीत भाऊसाहेब सपकळ या उमेदवाराने ‘ब’ वर्गातून, तर भटक्या विमुक्त जाती व जमातीमधून माघार घेत श्री जय भवानीमाता पॅनलला पाठिंबा दिला. त्यामुळे श्री छत्रपती बचाव पॅनलमध्ये १४ जणांचीच लढत झाली. मात्र, सभासदांनी सर्वांना सपशेल नाकारल्याचे या निकालाने सिद्ध झाले आहे.
पॅनल टू पॅनल मतदान
सोमवारी येथील प्रशासन भवनात पार पडलेल्या मतमोजणीत श्री जय भवानीमाता पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याने या निकालाचा कल दिसून आला. अजित पवारांच्या नेतृत्वात पॅनलचे सर्वच उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर होते. सभासदांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज वाचक यांच्यावर विश्वास दाखवत पॅनल टू पॅनल मतदान केल्याचेही किरण गुजर यांनी सांगितले.
जाचक हेच अध्यक्ष
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वीच शेतकरी मेळाव्यामध्ये पृथ्वीराज जाचक यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी घोषणा केली होती. कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जाचक यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे कारखाना चालविणार असल्याचे त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितले होते. त्यामुळे आगामी पाच वर्ष जाचक हेच कारखान्याचे अध्यक्ष असतील. लवकरच याबाबत निवडणूक होऊन चेअरमन, व्हाइस चेअरमनच्या नावांची अधिकृत घोषणा होईल.
‘छत्रपती’ला पूर्वीचे वैभवाचे दिवस येणार
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी या निकालाबाबत ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की,‘छत्रपती’चा सभासद केंद्रबिंदू मानून आम्ही सर्वजण एकत्र आलो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली. त्याला सभासदांनी चांगला प्रतिसाद दिला. आमच्या पॅनलला चांगल्या मतांनी विजयी करीत सभासदांनी दाखविलेला विश्वास काैतुकास्पद आहे. छत्रपती कारखान्याला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी आम्ही तिघांनी दिलेला शब्द खरा करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू, ‘छत्रपती’ला निश्चित पूर्वीचे वैभवाचे दिवस आणण्यात आम्ही यशस्वी होऊ, सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र राहून संचालक मंडळ कार्यरत असेल, असे भरणे म्हणाले.
सभासदांचे आभार मानण्यासाठी शब्दच नाहीत
श्री जय भवानीमाता पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी ‘लोेकमत’शी बोलताना सांगितले की,‘छत्रपती’ कारखान्याचा सभासद अत्यंत सुज्ञ आणि तज्ज्ञदेखील आहे. कारखान्यावर प्रेम करणारा आमचा सभासद आहे. या सभासदांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर विश्वास ठेवून आम्हाला भरभरून मतदान केले. या सभासदांचे आभार कसे मानावे, हा प्रश्नच आहे. त्यांच्या ऋणातच राहणे आपण पसंत करू. त्यांचे आभार मानण्यास आमच्याकडे शब्द नाहीत. येणाऱ्या काळात सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करत काम करू, असे जाचक म्हणाले.