पुणे-नाशिक अंतर येणार तीन तासांवर, औद्योगिक महामार्ग तीन वर्षांत करणार पूर्ण - दादा भुसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 10:13 IST2025-07-12T10:12:52+5:302025-07-12T10:13:06+5:30

पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा राज्याच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

Pune-Nashik distance will be reduced to three hours, industrial highway will be completed in three years - Dada Bhuse | पुणे-नाशिक अंतर येणार तीन तासांवर, औद्योगिक महामार्ग तीन वर्षांत करणार पूर्ण - दादा भुसे

पुणे-नाशिक अंतर येणार तीन तासांवर, औद्योगिक महामार्ग तीन वर्षांत करणार पूर्ण - दादा भुसे

पुणे : पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्पाचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार असून, मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तीन वर्षांच्या आत हा महामार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. या महामार्गामुळे पुणे ते नाशिक अंतर अडीच ते तीन तासांवर येणार आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या अर्धातास चर्चेला उत्तर देताना भुसे बोलत होते. पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा राज्याच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे सांगून भुसे म्हणाले, सध्या तो अंतिम टप्प्यात आहे. या महामार्गामुळे पुणे ते नाशिक अंतर अडीच ते तीन तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. परिणामी, दोन्ही शहरांमधील उद्योग, वाहतूक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या महामार्गाच्या माध्यमातून दोन्ही शहरांदरम्यान एक मजबूत औद्योगिक कॉरिडॉर निर्माण होणार आहे. अनेक लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना थेट जोडणी मिळणार असून, रोजगार निर्मितीला हातभार लागणार आहे, तसेच काही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे व विकासपथावर असलेली गावेही या महामार्गाने जोडली जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

ते म्हणाले, या प्रकल्पात जिराईत व बागायती जमिनींचे भूसंपादन होणार असून, शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रत्येक टप्पा पार पडणार असून, कायदेशीर नियमांचे पालन करून न्याय्य मोबदला देण्यात येणार आहे. महामार्गाच्या अलाइनमेंटदरम्यान काही तांत्रिक बाबींचा विचार करावा लागत आहे. नाशिक परिसरातील लष्करी विभाग, प्रस्तावित रिंगरोड आणि सुरत-चेन्नई महामार्ग यांच्यासोबत समन्वय साधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी रचनेमध्ये फेरबदल आवश्यक ठरत आहे. यासाठी विशेष सल्लागार व तज्ज्ञांकडून अभ्यास करून निर्णय घेतले जात आहेत.

 

Web Title: Pune-Nashik distance will be reduced to three hours, industrial highway will be completed in three years - Dada Bhuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.