पुणे - नगर महामार्गावर भीषण अपघात; बस चालकाचा ताबा सुटल्याने दोघांचा मृत्यू, तर पाच जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 18:23 IST2021-06-27T18:23:07+5:302021-06-27T18:23:47+5:30
महामार्गावरील कोंढापुरी जवळ सकाळी दहाच्या सुमारास घडली घटना

पुणे - नगर महामार्गावर भीषण अपघात; बस चालकाचा ताबा सुटल्याने दोघांचा मृत्यू, तर पाच जण जखमी
शिक्रापूर: पुणे - नगर महामार्गावरुन कोंढापुरी जवळ आज सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने आलेल्या बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे पुणे - नगर महामार्गावरुन एक बस जेबील कंपनीच्या कामगारांना सोडून चालली होती. त्यावेळी अचानक बसचालकाचा ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडकून पुढे एका मंदिराला धडकली. दरम्यान बसने यावेळी शेजारील काही दुचाक्या व एका सायकलला चिरडले. त्यानंतर दुकानांचे नुकसान करत शेवटी बसखाली एक दगड अडकल्याने ती थांबली.
या घटनेत कोंढापुरीचे माजी सरपंच शामराव दगडू लोखंडे, रामचंद्र बुवाजी वाघमोडे दोघे (रा. कोंढापुरी ता. शिरुर) या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर कुंडलिक गायकवाड, मंगलसिंग पवार दोघे (रा. कोंढापुरी ता. शिरुर) तसेच बसचालक अशोक सुदाम मते (वय २३ रा. ईकोग्रम सोसायटी शिक्रापूर ता. शिरुर) हे तिघे जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. अधिक तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहे