पुणे महापालिकेने पाठवले पत्र; सह्याद्री हॉस्पिटलकडे मागितली मणिपालसोबतच्या करारनाम्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 21:02 IST2025-07-16T21:02:05+5:302025-07-16T21:02:18+5:30
सह्याद्री हॉस्पिटल यांच्याकडून मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुप या संस्थेसमवेत करारनामा केल्याची प्रत घेतली असल्यास त्याबाबतचे वर्षिक भाडे रक्कमेच्या पावत्या सात दिवसाच्या आत पालिकेकडे सादर कराव्यात

पुणे महापालिकेने पाठवले पत्र; सह्याद्री हॉस्पिटलकडे मागितली मणिपालसोबतच्या करारनाम्याची माहिती
पुणे : मणिपाल हॉस्पिटल्सने कॅनडातील ओंटारिओ टीचर्स पेंशन प्लॅनकडून सह्याद्री हॉस्पिटल्स समूहाचे अधिग्रहण केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. पुणे महापालिकेने सह्याद्री हॉस्पिटलची जागा कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांना प्रतिवर्षीचे १ रूपये भाडे या अटीवर ९९ वर्ष कालावधीसाठी भाडेपट्ट्याने दिलेली आहे. कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांचेकडून सह्याद्री हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्याकडून मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुप या संस्थेसमवेत करारनामा केल्याची प्रत आणि पालिका आयुक्ताची परवानी घेतली असल्यास त्याबाबतची प्रत सात दिवसाच्या आत पालिकेकडे सादर करावी असे पत्र पुणे महापालिकेेने कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट, सह्याद्री हॉस्पिटल इमारत यांना पाठिवले आहे.
एरंडवणा, फायनल प्लॉट नं.३० येथील १ हजार ९७६ चौरस मीटर जागा कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला प्रीमीयम ५३ लाख ३५ हजार २०० रूपये आणि प्रति वर्षीचे १ रूपये भाडे देण्याच्या अटीवर ९९ वर्ष कालावधीसाठी भाडेपट्ट्याने दिलेली आहे. या जागेचा भाडे करारनामा पुणे महापालिका व कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांच्यामध्ये २७ फेबुवारी १९९८ रोजी झाला आहे. हा करारनामा कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांचेवर बंधनकारक आहे. कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांचेकडून सहयाद्री हॉस्पिटल यांचे समवेत सामंजस्य करार ३० सप्टेंबर २००६ रोजी झाला आहे. सध्या सहयाद्री हॉस्पिटल यांनी परस्पर मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुप यांना हस्तांतरित केले आहे. मात्र पुणे महापालिका आणि कोकण मित्र मंडळ यांच्या समवेत करण्यात आलेल्या करारनाम्यातील अटीमध्ये भाडेकराराने भाड्याने दिलेली जागा अगर तिचा कोणताही भाग, अथवा या जागेवर बांधण्यात येणाऱ्या इमारतीचा कोणताही भाग हा लिहून देणार यांना अन्य कोणाही संस्थेस भाड्याने, पोटभाड्याने, अथवा अन्य कोणत्याही प्रकारे व कोणत्याही कारणास्तव देता येणार नाही. मात्र हॉस्पिटल योग्य रीतीने चालविण्याचे उद्देशाने सेवा-सुविधा उपलब्ध करण्यासाठी योग्य संस्था, कंपनी यांचे बरोबर करारनामा करण्यास सवलत राहील, असे नमूद आहे. भाडे कराराने देण्यात आलेली जागा त्यांनी इतर कोणालाही गहाण, दान, बक्षीस यासह . कोणत्याही जडजोखमीत गुंतवता कामा नये, या जागेबावत अन्य कसल्याही प्रकारचे हक्क निर्माण करण्याचा अधिकार लिहून देणार यांना राहणार नाही असे नमुद केले आहे
कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांच्याकडून सह्याद्री हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्याकडून मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुप या संस्थेसमवेत करारनामा केल्याची प्रत आणि पालिका आयुक्ताची परवानी घेतली असल्यास त्याबाबतची प्रत ,प्रमियम आणि वर्षिक भाडे रक्कमेच्या पावत्या सात दिवसाच्या आत पालिकेकडे सादर करावी असे पत्र पुणे महापालिकेेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त वसुंधरा बारवे यांनी पाठविले आहे.