पुणे महानगरपालिका निवडणुका: विद्यमानांना प्रभाग रचनेचा धसका, सोईस्कर प्रभागासाठी रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 03:12 PM2021-10-23T15:12:40+5:302021-10-23T15:20:45+5:30

राष्ट्रवादीतील या चढाओढीमुळे तणाव निर्माण झाला असल्याची कुजबूज आहे. स्वहितापेक्षा पक्ष हिताचा विचार करून सर्वांना सोबत घेवून सर्वसमावेशक निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा अनेकजणं करत आहेत

pune municipal corporation election bjp ncp shivsena katraj ambegaon | पुणे महानगरपालिका निवडणुका: विद्यमानांना प्रभाग रचनेचा धसका, सोईस्कर प्रभागासाठी रस्सीखेच

पुणे महानगरपालिका निवडणुका: विद्यमानांना प्रभाग रचनेचा धसका, सोईस्कर प्रभागासाठी रस्सीखेच

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादीचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तर राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा चंग बांधला आहेसोईस्कर प्रभाग रचना पदरात पाडून घेताना पक्ष हिताचा कडेलोट महागात पडण्याची शक्यता आहे

पांडुरंग मरगजे

धनकवडी: मोदी लाटेतही भाजपाला धोबीपछाड देणाऱ्या दक्षिण उपनगरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना प्रभाग रचनेचाच धसका घेतला असल्याचे चित्र आहे. सोईस्कर प्रभाग पदरात पाडून घेण्याच्या चढाओढीत पक्षाचं नुकसान टाळण्याचे आव्हान राष्ट्रवादीपुढे आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेला मिळाले आणि त्यानुसार प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्षात झाली.

दरम्यान गेली वर्ष दोन वर्ष एक सदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणुका होणार असा ठाम विश्वास बाळगून असलेले विद्यमान किमान दोनचा तर निश्चित होईल या अंदाजापर्यंत येऊन पोहोचले होते. दरम्यान त्रिसदस्यीय प्रभाग पध्दतीने येत्या निवडणुका होणार असल्यामुळे इच्छूकांसह दिग्गज विद्यमान नगरसेवकांसमोर नवे आव्हान ठाकले आहे. या बदललेल्या स्थितीत आपला प्रभाग सोईस्कर असेल तरच निवडणूक जिंकणं सुलभ होणार हे ओळखून गेली तीन आठवडे जी चाचपणी सुरू आहे याच्या सुरस कथा मतदारांमध्ये रंगत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे शहराच्या कठावरचे तीन प्रभाग केवळ प्रभाग रचनेच्या चक्रव्युहात अडकले असल्याची स्थिती आहे. धनकवडी, कात्रजसहआंबेगावातून महापालिकेत राष्ट्रवादीचे तब्बल आठ नगरसेवक देणाऱ्या प्रभाग क्रमांक ३८, ३९ व ४० मधील प्रभाग रचनेच्या लाटा एकमेकांवर आदळू लागल्या आहेत. मनसेचे वसंत मोरे यांच्या व्यतिरिक्त केवळ पक्ष पाठबळावरच निवडून येणाऱ्या बहुतांश नगरसेवकांना सोईस्कर प्रभाग रचनाच तारणहार ठरणार आहे. पक्षश्रेष्ठींच्या जवळच्या दिग्गजांनी स्वतःला सोईस्कर असलेल्या प्रभाग रचनेचा आग्रह धरला आहे. मात्र याच वेळी आपल्या सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक राष्ट्रवादीतील या चढाओढीमुळे तणाव निर्माण झाला असल्याची कुजबूज आहे. स्वहितापेक्षा पक्ष हिताचा विचार करून सर्वांना सोबत घेवून सर्वसमावेशक निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा अनेकजणं करत आहेत. भाजपाला धक्का देऊन महापालिकेचे सत्ताधीश होण्यासाठी महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. राष्ट्रवादीचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तर राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. मात्र सोईस्कर प्रभाग रचना पदरात पाडून घेताना पक्ष हिताचा कडेलोट महागात पडणार आहे. अन्यथा हा राजकीय फायदा उचलण्यासाठी टपलेली भाजपा या हालचालीकडे लक्ष ठेवून आहे.

Web Title: pune municipal corporation election bjp ncp shivsena katraj ambegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.