मुरलीधर मोहोळ यांच्या काळात पुणे महापालिका भ्रष्टाचारग्रस्त झाली; रवींद्र धंगेकरांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 14:52 IST2025-10-25T14:52:08+5:302025-10-25T14:52:55+5:30
बढेकर बिल्डर हा जैन बोर्डिंग जागा खरेदी प्रकरणाशी संबंधित असून, मोहोळ यांचे व्यावसायिक संबंध आहेत

मुरलीधर मोहोळ यांच्या काळात पुणे महापालिका भ्रष्टाचारग्रस्त झाली; रवींद्र धंगेकरांचा आरोप
पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे खासदार होण्यापूर्वी महापौर होते. महापौर असताना ते पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरत होते. ही गाडी कोथरूडच्या बढेकर बिल्डरची होती. हा बिल्डर जैन बोर्डिंग जागा खरेदी प्रकरणाशी संबंधित असून, मोहोळ यांचे व्यावसायिक संबंध आहेत, असा आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यांनी याबाबतचे फोटोही समाज माध्यमात पोस्ट केले आहेत.
धंगेकर म्हणाले, साडेनऊ हजार कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी उपलब्ध होऊ शकली नाही, म्हणून ते बिल्डरची गाडी वापरत होते का? या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होईल, असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले? याबाबत जनतेला उत्तरे मिळाली पाहिजेत. मोहोळ यांच्या अनेक कृतींवर मी सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र, जैन मंदिर प्रकरणात जागा चुकीच्या पद्धतीने लुटली गेली, तेव्हा या प्रकरणाची सार्वजनिक चौकशी होणे आवश्यक आहे. मोहोळ यांचा जैन बोर्डिंग जागा खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसांत पाहिले आहेत. परंतु, तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग सांगतात. तपास यंत्रणांनी हे प्रकरण नीट तपासले पाहिजे, तरच पुणेकरांची झालेली फसवणूक समोर येईल, असेही धंगेकर म्हणाले.
कोथरूडमधील प्रस्तावित रस्ते, बोगदे बिल्डर्ससाठी
कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत. वेताळ टेकडी येथे टनेल, एचसीएमटीआर रस्ता आणि बालभारती ते पौड फाटा लिंक रोड हा प्रकल्प आणण्यासाठी माननीय इतके अतिउत्साही आहेत? त्यांनी हजारो पर्यावरणवाद्यांचा विरोध पत्करला. हे सर्व ते वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी, यासाठी करत नाहीत. तर गोखले, बढेकर आणि आणखी तीन बिल्डर्ससाठी करत आहेत. या बिल्डर्सच्या जमिनी या भागात आहेत. वेताळ टेकडी परिसरात या बिल्डर्सना प्रकल्प करता यावेत, यासाठी त्यांनी हा घाट घातला आहे. अर्थात बिल्डर नावाला असतात, माननीयच मालक असतात. आता हे शपथपत्रात लीगल बिल्डर पार्टनरशिप दाखवतात, तर अनधिकृत किती पार्टनरशिप असतील? याचा विचार न केलेला बरा, असाही घणाघात धंगेकर यांनी केला.
मोहोळांच्या काळात पालिकेत भ्रष्टाचार बोकाळला
पुण्याच्या विकासात अनेक महापौरांनी योगदान दिले. परंतु, मोहोळ यांच्या काळात महापालिका भ्रष्टाचारग्रस्त झाली. एक वर्षाची टेंडर प्रणालीला बदलून ५ वर्षांपासून १०, १५, २० वर्षांपर्यंत करण्यात आली. ज्यामुळे महापालिकेची कार्यप्रणाली दुरवस्थेत पोहोचली, असा आरोपही धंगेकरांनी केला.
धंगेकरांबद्दल आता मला बोलायचं नाही : मोहोळ
बढेकर प्रॉपर्टीजमध्ये पार्टनर असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट दिले होते. त्या पार्टनरशिपमधली माझी गाडी मी वापरली. महापालिकेची गाडी मी वापरली नाही. लोकसभा निवडणुकीत मी दिले आहे की, मी स्वतःची गाडी वापरली. पुण्याला एक महापौर असा मिळाला, जो स्वतःची गाडी वापरणारा आहे. याचा पुणेकरांना अभिमान वाटायला हवा. आता हे शवटचे स्पष्टीकरण असून, यापुढे मला धंगेकरांबद्दल काही बोलायचे नाही अथवा उत्तर द्यायचे नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. त्यांच्यावर २०११ मध्ये जमीन हडपली म्हणून गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर १० गुन्हे दाखल आहेत, माझ्यावर एकही नाही, असेही मोहोळ म्हणाले.
चौकशी करण्याची पंतप्रधानांकडे मागणी
पुण्यातील जैन ट्रस्टच्या मालमत्ता व्यवहारातील अनियमितता आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागाबाबत चौकशी करून कारवाई करावी, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केल्याची माहिती आपचे नेते व माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली.