Pune Metro: पुण्यात रविवारी महामॅरेथॉन; पहाटे तीनपासून मेट्रो धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:08 IST2025-10-31T17:07:50+5:302025-10-31T17:08:40+5:30
पहाटे तीन ते पहाटे सहा वाजेपर्यंत दोन्ही मार्गिकांवर (पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी) दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध असेल.

Pune Metro: पुण्यात रविवारी महामॅरेथॉन; पहाटे तीनपासून मेट्रो धावणार
पुणे: पुण्यात राष्ट्रीय एकता दौड (''रन फॉर युनिटी'') अंतर्गत ''पुणे रन फॉर युनिटी'' महामॅरेथॉन दोन नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे. यासाठी महामेट्रोकडून दोन नोव्हेंबरला पहाटे तीनपासून मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ''राष्ट्रीय एकता दिवस'' म्हणून देशभरात साजरी केली जाते. त्या निमित्ताने ''रन फॉर युनिटी'' या उपक्रमाचे आयोजन केले जाते. ''पुणे रन फॉर युनिटी'' महामॅरेथॉन स. प. महाविद्यालय, पुणे येथून सुरू होणार आहे. पुणे शहरासाठी ऐतिहासिक असणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोने आपल्या प्रवासी सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन नोव्हेंबरला पहाटे तीनपासून पुणे मेट्रो सेवा सुरू होणार आहे. पहाटे तीन ते पहाटे सहा वाजेपर्यंत दोन्ही मार्गिकांवर (पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी) दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध असेल. त्यानंतर पहाटे सहा वाजेनंतर रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रो सेवा नियमित वेळेनुसार सुरू राहील. त्यामुळे नागरिकांना महामॅरेथॉनच्या ठिकाणी वेळेवर, सोयीस्करपणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पोहोचणे शक्य होणार आहे.