Pune Mayor: राष्ट्रवादीला हुसकावणाऱ्या काँग्रेसचीही माघार; पुणे महापालिकेत कणखर विरोधी पक्षाची भूमिका कोण निभावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 10:26 IST2026-02-10T10:26:14+5:302026-02-10T10:26:28+5:30

Pune Mayor आता निवडणुकीनंतर पहिल्याच सभेत मात्र काँग्रेसने भाजपला थेट सरेंडर होण्याच्या घेतलेल्या भूमिकेने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

Pune Mayor Congress, which ousted NCP, also withdrew; Who will play the role of a strong opposition party in Pune Municipal Corporation? | Pune Mayor: राष्ट्रवादीला हुसकावणाऱ्या काँग्रेसचीही माघार; पुणे महापालिकेत कणखर विरोधी पक्षाची भूमिका कोण निभावणार?

Pune Mayor: राष्ट्रवादीला हुसकावणाऱ्या काँग्रेसचीही माघार; पुणे महापालिकेत कणखर विरोधी पक्षाची भूमिका कोण निभावणार?

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार उभे करण्यास उद्युक्त करणाऱ्या काँग्रेसनेही महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने महापालिकेत कणखर विरोधी पक्षाची भूमिका कोण निभावणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप ११९, राष्ट्रवादी (अजित पवार) २७, काँग्रेस १५, राष्ट्रवादी (शरद पवार) २ आणि उद्धवसेना १ असे नगरसेवक निवडून आले. या निवडणुकीत पुणेकरांनी स्पष्ट कौल दिल्याने भाजपचा महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित होते. पुरेसे संख्याबळ नाही आणि त्यातच पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक न लढण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत हे आम्ही यापूर्वी म्हटले होते. ते आज सिद्ध होत आहे, असे म्हणत काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर तिखट शब्दांत टीका केली. यानंतर राष्ट्रवादीने महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवार उभे केले.
निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीने दोन्ही अर्ज माघारी घेतले. त्यानंतर महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांची निवडणूक लढविण्यावर ठाम असलेल्या काँग्रेसनेही अखेरच्या क्षणी कोलांटउडी घेत दोन्ही पदांसाठीचे अर्ज माघारी घेतले. यामुळे ही निवडणूक भाजपला बिनविरोध करणे शक्य झाले. त्यामुळे महापालिका सभागृहात विरोधी पक्षाची धारच कमी झाली.

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष राज्यात भाजपसमवेत सत्तेत असल्याने काँग्रेसने राष्ट्रवादीसह एकत्र निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. त्याचा फटका सर्वच विरोधी पक्षांना निवडणुकीत बसला तर भाजपला थेट फायदा झाला होता. आता निवडणुकीनंतर पहिल्याच सभेत मात्र काँग्रेसने भाजपला थेट सरेंडर होण्याच्या घेतलेल्या भूमिकेने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेसने केली होती. मात्र, सोमवारी सकाळी काँग्रेसचे पुण्याचे निरीक्षक बंटी ऊर्फ सतेज पाटील यांचा फोन आला. त्यांनी दोन्ही उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे सूत्रे फिरली अन् दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

Web Title : पुणे महापौर चुनाव: कांग्रेस पीछे हटी, विपक्ष कौन?

Web Summary : एनसीपी के बाद कांग्रेस ने पुणे महापौर चुनाव से नाम वापस लिया। सवाल: निगम में विपक्ष की भूमिका कौन निभाएगा? भाजपा को निर्विरोध जीत।

Web Title : Pune Mayor Election: Congress Withdraws, Who Will Be Opposition?

Web Summary : Congress withdrew from Pune mayoral election after NCP. Questions arise: Who will fulfill the opposition's role in the corporation? BJP gains uncontested victory.