Pune: सवलतीत दंड भरण्याची लोकअदालत; वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडले, मुदत वाढवण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 16:30 IST2025-09-12T16:30:23+5:302025-09-12T16:30:49+5:30
दुचाकी व चारचाकी वाहने, ज्यांची दंड रक्कम किरकोळ आहे, त्यांनाही तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते

Pune: सवलतीत दंड भरण्याची लोकअदालत; वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडले, मुदत वाढवण्याची मागणी
पुणे: नियम मोडणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. परंतु, वाहन चालकांनी दंड भरण्यासाठी दुर्लक्ष करतात. वाहन मालकांना दंड भरणे सोयीचे व्हावे, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वाहतूक विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालत येरवडा येथे आयोजित करण्यात आले आहे. परंतु, सवलत असल्याने दंड भरण्यासाठी वाहन
मालकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे शुक्रवारी (दि. १२) रोजी सकाळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. येरवडा येथे पुणे वाहतूक पोलिस यांनी लोकअदालत आयोजन करून वाहनांच्या दंडात निम्मी सवलत जाहीर केल्यानंतर पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर रात्रीपासून मोठी रांग लागली होती. त्यातच वाहतूक पोलिस खात्याने केवळ २०० नागरिकांनाच टोकन प्रवेश द्यायचे ठरवले होते. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. याबाबत वाहतूक खात्याकडे अल्प मनुष्यबळ व नियोजित व्यवस्थापन नसल्यामुळे दंड भरण्यासाठी येणाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अत्यंत ढिसाळ नियोजन, अकुशल स्टाफ अशा कारणाने नागरिक खूप चिडले होते. काही नागरिकांनी रात्रीपासूनच रांगा लावले होते. ट्रॅव्हल, टूर कंपन्या, टूरिस्ट वाहने यांचे दंड भरपूर असल्याने त्यांचा भरणा खूप होता. दुचाकी व चारचाकी वाहने, ज्यांची दंड रक्कम किरकोळ आहे, त्यांनाही तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सवलतीमुळे गर्दी
वाहनचालकांकडून नियम मोडल्यावर ऑनलाइन दंड आकारला जातो. परंतु, तो दंड त्याच वेळी भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. पोलिसांकडून याबाबत वारंवार सांगण्यात येते; परंतु वाहनचालक दंड भरत नाही. दुसरीकडे लोकअदालतीत सवलत दिल्यामुळे हजारो वाहन मालकांनी येरवडा येथे गर्दी केली होती. सवलत असल्यामुळे वाहन मालक दंड भरण्यासाठी गर्दी करतात. इतर वेळी मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात. नागरिकांना प्रत्येक गोष्टी सवलत पाहिजे, हे यावरून दिसून येते. परंतु, गर्दी जास्त झाल्यामुळे वाहतूक विभागाने केलेले नियोजन अपुरे पडले. परिणामी गोंधळ निर्माण झाला होता.
जर ऑनलाइन किंवा ॲपद्वारे सवलतीत दंड भरण्याची परवानगी दिली तर ही परिस्थिती उद्भवली नसती. वाहतूक पोलिस याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे. नागरिक दंड भरण्यासाठी येतात; परंतु येथील सुविधा अपुरी आहे. त्यामुळे दिवसभर रांगेत उभे राहावे लागते. -सागर मोरे, वाहन मालक