Leopard Attack : बिबट्याला आवरण्यासाठी जिल्ह्यात होणार चार जंगलांची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:04 IST2025-11-28T10:04:10+5:302025-11-28T10:04:50+5:30
- कायमच्या मुक्कामाची सोय : जागा तयार, प्रस्ताव तयार, सरकारी मंजुरीची प्रतीक्षा

Leopard Attack : बिबट्याला आवरण्यासाठी जिल्ह्यात होणार चार जंगलांची निर्मिती
- राजू इनामदार
पुणे : शहरात वारंवार येणाऱ्या बिबट्यांना आवरण्यासाठी वनविभागाच्या वतीने जिल्ह्यात चार ठिकाणी जंगलांची निर्मिती करण्यात येत आहे. शिरूर तालुक्यात पिंपरखेड व न्हावरा येथे तसेच जुन्नर व मंचरमध्ये ही चार जंगले तयार होणार आहेत. त्यासाठी जागा तयार आहे, त्याचा प्रस्तावही तयार आहे, त्यावर आता सरकारी मंजुरीच्या शिक्कामोर्तबाची वनखात्याला प्रतीक्षा आहे. बिबट्यांना हा अधिवास मिळाला की त्यांचे शहरात प्रवेश करणे कमी होईल, असा दावा वनविभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.
या चारही ठिकाणी वनविभागाची बरीच मोठी मोकळी जागा आहे. बिबटप्रवण क्षेत्रातच या जागा निवडण्यात आल्या आहेत. ३० ते ५० एकर असे त्यांचे क्षेत्र आहे. सध्या साधे कुरण व विस्तीर्ण मोकळे पठार असे या जागांचे स्वरूप आहे.
शिरूरमधील डोंगरपायथ्याला असलेली गावे तसेच जुन्नर-मंचर येथील पाण्याचे मुबलक साठे, लपण्यासाठी ऊसशेती व सहजपणे वस्तीत शिरता येईल, इतके लहान अंतर यामुळे या तालुक्यांमधील गावांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार आहे. पिंपरखेड, जांबूत या गावांमध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत तीन हल्ले होऊन त्यात तीन बळी गेल्यानंतर या जंगलनिर्मितीच्या प्रस्तावाला गती मिळली आहे.
यात सर्वप्रथम ही संपूर्ण जागा तारांचे मोठे कुंपण घालून बंदिस्त केली जाईल. आतील परिसरात वेगाने वाढणाऱ्या गवताचे बी लावण्यात येईल. त्याचबरोबर देशी वृक्षांच्या बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या रोपांची लागवड करण्यात येईल. पाणवठे तयार करण्यात येतील. या कृत्रिम लागवडीची लवकरच नैसर्गिक वाढ होईल. त्यात सरपटणारे साप, विंचू व या प्रजातीमधील उभयचर प्राणी येतील. त्यानंतर ससे तसेच पक्ष्यांच्या संख्येतही नैसर्गिकपणे वाढ होईल. त्यात रेस्क्यू केलेल्या बिबट्यांना सोडण्याचा वनविभागाचा विचार आहे. नैसर्गिकपणे खाद्य मिळाले, लपण्याच्या जागा तयार झाल्या की बिबट्या शहरात येणार नाही. जंगलाच्या सीमेवर बिबट्या आला तरीही त्याला बाहेर पडता येणार नाही, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. माणिकडोह (जुन्नर) मधील बिबट संवर्धन केंद्रात सध्या ४५ बिबटे नैसर्गिक अधिवासात बंदिस्त आहेत. तिथेच याच प्रकारचे दुसरे एक केंद्रही तयार होत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खाद्याच्या कमतरतेमुळे बिबटे थोडे बिथरले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या अधिवासाच्या बाहेर येतात. त्यांना त्यांचा हरवलेला अधिवास परत मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. वनविभागाच्या वतीने अशा पद्धतीने जंगल तयार केले जातेच, इथे ते खास बिबट्यांसाठी म्हणून तयार केले जात आहे. - प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक, जुन्नर वनविभाग