बारामतीत अतिवृष्टीने हाहाकार, फुटलेल्या निरा डावा कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 10:51 IST2025-05-27T10:51:21+5:302025-05-27T10:51:52+5:30
- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहाटेपासूनच पाहणी करत घेतला आढावा

बारामतीत अतिवृष्टीने हाहाकार, फुटलेल्या निरा डावा कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात
बारामती : बारामती व इंदापूर तालुक्यांत अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. ‘काळजी करू नका, तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्याबरोबर आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांना मदत करणे राज्य शासनाचे कर्तव्य असून, झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करावेत. राष्ट्रीय आपत्ती कायद्यानुसार बाधित नागरिकांना मदत करण्यात येईल, असे आदेश यावेळी पवार यांनी दिले.
बारामतीत रविवारी (दि. २५) झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार उडाला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार राज्यातील सर्व कार्यक्रम रद्द करत बारामतीत पोहोचले. सोमवारी (दि. २६) पहाटेच पवार यांनी नुकसानग्रस्त भागाचा दाैरा सुरू केला. पवार यांनी सकाळी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील इमारती, कन्हेरी वनोद्यान, कन्हेरी काटे वस्ती येथील नीरा डावा कालवा, सोनगाव, ढेकळवाडी, इंदापूर तालुक्यातील सणसर, निंबोडी, शेटफळगढे, मदनवाडी आणि भिगवण येथील बसस्थानक परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बारामती, इंदापूर आणि दौंड या तालुक्यांत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या अतिवृष्टीमुळे घरांचे, पिकांचे, शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या भागातील नागरिकांची अल्पोपहार, जेवण आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावरील साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावरील खड्डे भरण्यासह परिस्थितीचा अंदाज घेऊन बंद असलेले रस्ते सुरू करण्यात येत आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सणसर परिसरातील बाजारपेठ विचारात घेऊन सेवा रस्ता तयार करावा, अशा सूचना पवार यांनी दिल्या. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी अनिल बागल, सचिन खुडे आदी उपस्थित होते.
एकही नागरिक बेघर होणार नाही
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ मिळालेले, परंतु या आपत्तीत घराचे नुकसान झालेल्या नागरिकांना विशेष बाब म्हणून घरकुल मंजूर करण्याबाबत विचार करण्यात येईल. एकही नागरिक बेघर राहणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नागरी वस्तीमध्ये रोगराई पसरू नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषध फवारणी करावी. कालवा फुटलेल्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करावी. ओढ्यामधील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करून ओढा रुंदीकरण, खोलीकरणाचे काम करण्यात येणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे. याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येईल.