Pune Heavy Rains: पुण्याच्या रस्त्यांवर अवकाळीच्या लाटा..! शहरातील रस्ते जलमय, अनेक ठिकाणी पाणी शिरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 10:32 IST2026-04-03T10:32:29+5:302026-04-03T10:32:52+5:30
Pune Unseasonal Heavy Rain: चेंबर तुंबले, झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक कोंडी

Pune Heavy Rains: पुण्याच्या रस्त्यांवर अवकाळीच्या लाटा..! शहरातील रस्ते जलमय, अनेक ठिकाणी पाणी शिरले
पुणे : शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह पुणेकरांची दाणादाण उडवली. तासाभराच्या तुफानी पावसाने पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले. जणूकाही समुद्राच्या लाटाच उसळत आहेत, अशीच स्थिती रस्त्यांवर पहायला मिळाली.
त्या पाण्यात अनेक वाहने अडकून पडली. दरम्यान, शहराच्या विविध भागात पाणी शिरले आणि झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. शहरात अनेक ठिकाणचे चेंबर आणि पावसाळी लाइन तुंबल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, झाड पडल्याने सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती येथे एका फूल विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडत आहे. मागील आठवडाभरापासून शहर व परिसरातील कमाल तापमान चाळिशी गाठत आहे. ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसभर ऊन आणि रात्री हलकासा गारवा असे वातावरण निर्माण होत आहे. सोमवारी मात्र सकाळपासून उन्हाचा चटका असताना दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यानंतर मंगळवारी विश्रांती घेतल्यानंतर बुधवारी सायंकाळी दमदार पाऊस झाला.
यानंतर गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. जवळपास दीड ते दोन तास कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यातच पावसाळी लाइन आणि चेंबर तुंबल्याने रस्त्याच्या लगतची दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. पावसासह सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या.
रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी आणि पडलेले झाड आणि फांद्यांमध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शिवाय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची आणि दुचाकीस्वारांची चांगलीच दाणादाण व तारांबळ उडाली.
पावसाळी कामांसाठी आठवडाभरात निविदा -
महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे, नाले, पावसाळी गटारे, चेंबर आदींची साफसफाई करून राडारोडा उचलण्याची कामे केली जातात. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरण केले जाते. ही कामे दरवर्षी एप्रिलमध्ये सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातात. तसेच विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदाई करण्यास परवानगी दिलेल्या संस्थांनी १ मेपासून खोदाई बंद करून ३१ मेपर्यंत रस्ते पूर्ववत करण्याचे बंधन घालण्यात येते. त्यामुळे अद्याप महापालिकेने पावसाळी कामांच्या निविदा काढलेल्या नाहीत. त्यामुळे अद्याप पावसाळी लाइन, ओढे आणि नाल्यांची साफसफाई झालेली नाही. त्यामुळे गुरुवारी झालेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचल्याचे पहायला मिळाले. यासंदर्भात महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पावसाळी कामांच्या निविदा आठवडाभरात काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.
अवकाळी पावसामुळे पुणेकर अंधारात
शहर व परिसरात गुरुवारी झालेल्या पावसामुळे आणि वादळामुळे अनेक अति उच्चदाब व उच्चदाब वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने पुणे शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. महावितरणचे वीज कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर परिश्रम घेत आहेत. अनेक भागांचा बाधित झालेला वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरूदेखील करण्यात आला आहे. काही भागात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.
पुण्यातील पाऊस (मिमी) :
खडकवासला १०७
कात्रज ८६
एनडीए : ८४
डेक्कन ८२
वारजे ८०
शिवाजीनगर ६५
हडपसर : ४२.५ पाषाण ३६.३
दापोडी २९
चिंचवड २८.५
माळीण १८.५
डुडुळगाव १३.५
नारायणगाव १२
तळेगाव ६.५ राजगुरूनगर ४.५
शिरूर २
बालेवाडी १