उष्णतेमुळे पुणेकर हैराण..! पुण्यासह राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढला; दिवसरात्र उकाडा
By श्रीकिशन काळे | Updated: March 15, 2025 16:33 IST2025-03-15T16:31:37+5:302025-03-15T16:33:54+5:30
पुण्यासह राज्यामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांशी भागात दुपारचे तापमान चाळीशी पार गेले आहे.

उष्णतेमुळे पुणेकर हैराण..! पुण्यासह राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढला; दिवसरात्र उकाडा
पुणे : पुणे शहर आता चांगलेच तापू लागले असून, पुणेकर उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. सूर्यनारायण आग ओकत असून, दिवसा तापमानाचा पारा चाळीशीत पोचत आहे, तर रात्रीचे तापमानही वाढत आहे. परिणामी यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरत असल्याचे चिन्ह आताच दिसू लागले आहे.
सध्या उन्हामुळे दुपारी घराबाहेर जाणे देखील अवघड होत आहे. उन्हात गेल्याने अंगाची लाही लाही होत आहे. पुण्यासह राज्यामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांशी भागात दुपारचे तापमान चाळीशी पार गेले आहे. रात्रीचे तापमानही वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हवामान विभागाने विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे.
राज्यामध्ये रविवारी (दि.१६) यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तर अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, नागूपर, वर्धा, यवतमाळ, मालेगाव आणि सोलापूर जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्या पार पोचले आहे. दरम्यान, राज्यातील तापमानातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे, अंगात पांढरे कपडे परिधान करावेत, जेणेकरून उन्हाचा चटका अधिक बसणार नाही, असा सल्ला जाणकारांनी दिला.