Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:01 IST2025-08-25T13:00:21+5:302025-08-25T13:01:36+5:30
Sinhagad Fort Gautam Gaikwad News: गौतम गायकवाड हा तरुण सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेला आणि बेपत्ता झाला. पाच दिवसांनी पोलिसांना तो सापडला. या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली.

Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
Gautam Gaikwad Sinhagad Fort News: सिंहगडावर किल्ल्यावर फिरायला गेल्यानंतर बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पोलिसांना सापडला. रविवारी सांयकाळी (२४ ऑगस्ट) शोध घेत असताना गौतम गायकवाड एका दरीत सापडला. त्याला तातडीने तिथून रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता, वेगळेच कारण समोर आले. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. गौतम बेपत्ता झाला नव्हता, तर त्याने स्वतःच अपहरणाचा बनाव रचला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. गौतमने असं करण्याचं कारणही पोलिसांनी सांगितले.
मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटणचा असलेला गौतम गायकवाड हा सध्या हैदराबादला राहतो. हैदराबादवरून तो मित्रांसह पुण्यातील सिंहगड किल्ला बघायला आला होता. बुधवारी (२० ऑगस्ट) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते सगळे सिंहगडावर पोहचले. तानाजी कड्याजवळ गेल्यानंतर तो लघुशंकेला जातो, असे सांगून गेला होता.
गौतम बराच वेळ आला नाही. त्यानंतर महेश शिंदे, हिमांशु शुक्ला, वैष्णवी आलगुडे आणि सूरज माळी या त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला. तो सापडला नाही, त्यामुळे त्यांनी पोलिसांना यांची माहिती दिली. पोलिसांनी ट्रेकर्स आणि नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला होता.
बेपत्ता गौतम गायकवाड कुठे होता?
पोलिसांनी सांगितले की, गौतमचा २० ऑगस्टपासून शोध सुरू होता. एका सीसीटीव्हीमध्ये तो पळून जाताना दिसला होता. त्यामुळे वेगळीच शंका उपस्थित होत होती. २४ ऑगस्ट रोजी गौतमचा शोध घेत असलेल्या एका ग्रुपला एका दरीत हालचाल होताना दिसली. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन बघितले असता गौतम गायकवाड तिथे पडलेला होता.
त्याला स्थानिकांनी तातडीने उचलून सिंहगडावर असलेल्या पार्किंगजवळ आणलं. हवेली पोलिसांनी गौतम गायकवाडच आहे का याची खात्री केली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गौतम गायकवाडने स्वतःच रचला अपहरणाचा बनाव
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासातून अशी माहिती समोर आली आहे की, तो चुकून गेला नव्हता, त्याने हे सगळं ठरवून केलं होतं. गौतमवर मोठं कर्ज आहे. त्यामुळे त्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव केला होता.