Pune Ganpati Festival : विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा परिधान करून वादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:21 IST2025-09-06T12:21:03+5:302025-09-06T12:21:14+5:30
यादृष्टीने आज शुक्रवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत सर्वच पथकांमध्ये लगबग पहायला मिळाली.

Pune Ganpati Festival : विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा परिधान करून वादन
पुणे : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता शनिवारी (दि. ६) बाप्पाच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने होत आहे. या मिरवणुकीत विविध ताल व ठेके वाजवण्यासाठी व गणेशभक्तांना आपल्या वादनावर ठेका धरायला लावण्यात उत्सुक आहेत. यादृष्टीने शुक्रवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत सर्वच पथकांमध्ये लगबग पहायला मिळाली.
पुण्याच्या गणेशोत्सवात ढोल-ताशा पथके गणेशभक्तांचे प्रमुख आकर्षण असतात. शहर व उपनगरांत जवळपास १७५ ते २०० पथके असून २५ ते २७ हजार तरुण-तरुणी वादक आहेत. या ढोल पथकांचा वादन सराव गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून शहराच्या विविध भागांत सुरू आहेत. या सरावादरम्यान जुन्या व नवीन वादकांनी नवे जुने ठेके व ताल वादनाचा सराव केला आहे. ज्यासाठी वादक गेली अनेक दिवस वादनाचा सराव करत आहेत, ती बाप्पाची विसर्जन मिरवणूक आज होत आहे. सरावादरम्यान जे ठेके व ताल शिकले, ते गणेशभक्तांच्या समोर सादर करण्यासाठी वादक उत्सुक आहेत.
तत्पूर्वी, शुक्रवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी सर्वच ढोल पथकांत लगीनघाई सुरू होती. वादक आपापले ढोल तयार करत होते. तयार केलेल्या ढोलावर स्वतःची नावे टाकून सहकाऱ्याला ढोल तयार करण्यासाठी मदत करत होते. हेच चित्र ताशावादकांमध्येही दिसत होते. तयार झालेले ढोल टेम्पोमध्ये भरण्याचीही कामे सुरू होती.
पथकांचा जोर संकल्पनेवर आधारित (थीम ओरिएंटेड)
ढोल पथकांकडून आजवर गाण्यांच्या चालींवर वादन करण्याकडे कल असे. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून पथकांचा जोर हा संकल्पनेवर आधारित (एखादी थीम घेऊन) वादनावर जास्त आहे. पथकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी, संभाजी महाराज, जय मल्हार, महाकाल यावर आधारित वेशभूषा व वादने केली जात आहेत. वादनामध्ये नवनवीन चाली, ताल, संबळ, दिमडी, ड्रमसेट यांचा वापर केला जात आहे.
मिरवणुकीत ऐकायला मिळणार हे ताल
एक ते सहा, रामजी की सवारी, नवीन पोपट, महाकाल, लावणी, ताल, झी-गौरव, भांगडा, राम लखन, रावडी राठोड, भजनी, इंद्रजीमी जम्बपर, फुलगाव, तिहाई, नवीन व जुना गावठी, धमार, कावड, देवीचा ठेका, जोगन, कच्ची बाजा आणि आणखी काही.