Pune Fashion Street Fire : " सगळंच गेलंय...आता उभं कसं राहायचं माहिती नाही.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 17:31 IST2021-03-27T17:30:44+5:302021-03-27T17:31:11+5:30
घरात दोन जण आजारी...थोडा धंदा होईल आणि त्यातून उपचाराला पैसा हाताशी येईल अशा अपेक्षेने ते या शनिवार रविवार ची वाट पाहत होते. पण तोच शनिवार त्यांची अपेक्षा धुळीला मिळवून गेला.

Pune Fashion Street Fire : " सगळंच गेलंय...आता उभं कसं राहायचं माहिती नाही.."
पुणे : ५५ वर्षांचे कय्युम कुरेशी सकाळपासून आपल्या जळून खाक झालेल्या दुकानात दर थोड्या वेळाने जात काही हाताशी लागतंय का बघतायेत. गेली १५ वर्ष ते इथल्या दुकानांत काम करत आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊनमधून आत्ता कुठे त्यांचा धंदा सावरत होता. शनिवार रविवार चा सीझन आणि सणवार लक्षात घेता ज्यादा समान खरेदी करून ठेवलं होते. घरात दोन जण आजारी...थोडा धंदा होईल आणि त्यातून उपचाराला पैसा हाताशी येईल अशा अपेक्षेने ते या शनिवार रविवार ची वाट पाहत होते. पण तो शनिवार त्यांच्या उरलेल्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पण धुळीला मिळवून गेला. रात्री दुकानाला आग लागली आणि सगळंच होत्याचं नव्हतं झालं.
कुरेशी म्हणाले " आमचं काहीच वाचलं नाही. नव्याने टी शर्ट आणले होते.आत्ता कुठे आम्ही सावरत होतो. कालच आम्ही लॉकडाऊन लागला तर काय याची भीती व्यक्त केली. होणाऱ्या नुकसानाची भीती खरी ठरली पण ती आगीमुळे. सगळंच गेलंय. आता उभं कसं राहायचं माहित नाही. "
कुरेशींसारखीच अवस्था इथल्या जवळपास प्रत्येकाची आहे. दुकानातल्या मालाचे जळालेले तुकडेच आता इथे दुकान होतं याची साक्ष सांगताहेत. दुसरे एक व्यापारी म्हणाले "माझं बेल्टच दुकान आहे. त्याचे आता तुकडेच शिल्लक राहिले आहेत. ८ महिने आमचा कामधंदा बंद होता.आता रमजानमध्ये धंदा होईल म्हणून माल भरला होता. पण काल लागलेल्या आगीत सगळंच गेलं. सरकार ने आता या सगळ्या परिस्थितीकडे बघून काय चूक काय बरोबर या वादात न पडता सरळ आम्हाला पुन्हा इथे दुकानं चालू करायला मदत करायला हवी. अनेक घरं संसार यावर अवलंबून आहेत."
अनेकांच्या आशा आकांक्षांची कालच्या आगीत राखरांगोळी झाली आहे. पण त्याहून ही मोठा प्रश्न त्यांचा समोर आहे तो म्हणजे पुढे काय ?