पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग अन् रिंगरोड प्रकल्पाला खेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 20:49 IST2021-06-11T20:18:05+5:302021-06-11T20:49:28+5:30
मरकळ येथे रेल्वे प्रकल्पासाठी संबंधित जमीन गटांचे भूसंपादन होणार आहे.

पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग अन् रिंगरोड प्रकल्पाला खेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा विरोध
शेलपिंपळगाव : मरकळ (ता.खेड) हद्दीतून प्रस्तावित पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे महामार्ग जात आहे. मात्र आमच्या भागातून रिंगरोड व रेल्वे अशा दोन्ही वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जमिनीचे भूसंपादन होणार आहे. त्यामुळे आमच्या अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. परिणामी आम्ही रिंगरोड तसेच रेल्वेमार्ग प्रकल्पाला आमच्या जमिनी देणार नसल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले.
मरकळ येथे रेल्वे प्रकल्पासाठी संबंधित जमीन गटांचे भूसंपादन होणार आहे. तत्पूर्वी मरकळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (दि.११) शासनाच्या वतीने खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. प्रारंभी रेल्वे मार्गाविषयी बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून आलेली सविस्तर माहिती, रेल्वे मार्गासाठी जमीन संपादन, शेतकऱ्यांना शासनाचा मोबदला रक्कम तसेच शेजारून शेतकऱ्यांसाठी सेवा रस्ते याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपुल बांधणार असल्याचे प्रांताधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, याच भागातून रिंगरोडचा प्रकल्प प्रस्तावित असून त्यासाठी देखील जमिनीचे भूसंपादन होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये काही शेतकऱ्यांच्या दोन ठिकाणी जमिनी जात आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्याने आमचा या दोन्ही प्रकल्पांना तीव्र विरोध असल्याचे बाधित शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे सांगितले.