'योग्य ती कारवाई होणार…’दीनानाथ रुग्णालयातील दुर्लक्ष प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:48 IST2025-04-04T14:47:44+5:302025-04-04T14:48:35+5:30

- तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली

pune Deputy Chief Minister Ajit Pawar spoke directly about the negligence case at Dinanath Hospital | 'योग्य ती कारवाई होणार…’दीनानाथ रुग्णालयातील दुर्लक्ष प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार थेटच बोलले

'योग्य ती कारवाई होणार…’दीनानाथ रुग्णालयातील दुर्लक्ष प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार थेटच बोलले

पुणे : शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांवर मातृछत्र गमावण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.



आज शिवसेनेकडून रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केले जात आहे. रुग्णालयाने १० लाख मागितले होते का? याबाबत विचारले असता अधिकाऱ्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. योग्य माहिती आपल्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल असे त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. रुग्णालयाच्या बाहेर विविध संघटना, पक्ष एकत्र येऊन आंदोलन करू लागले आहेत. हॉस्पिटलची जागा त्यांच्या ताब्यातून काढून घ्यावी. अधिकाऱ्यांना निलंबित करावे, रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई कारवाई अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. पतित पावन संघटनकडून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नावावर काळ फासलं गेलं आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यावर लोकांनी चिल्लर पैसे फेकले.

या घटनेवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलतांना संताप व्यक्त केला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात  सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.  

माध्यमांशी बोलतांना अजित पवार म्हणाले, पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीच्या झालेल्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने त्यांचे म्हणणे मांडले असले तरी संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या असून चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे.'अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

नेमकं काय घडलं ?

प्रसूती वेदना तीव्र झाल्याने महिलेला खासगी गाडीने २५ किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या रुग्णालयात दाखल करताच तिचा मृत्यू झाला.

अधिक माहितीनुसार, भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली उर्फ ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत होत्या. सुशांत यांनी पत्नीला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांच्याकडे १० लाखांची मागणी करण्यात आली. त्यावर अडीच लाख रुपये आता तातडीने भरतो. उपचार सुरू करा, अशी विनंती सुशांत यांनी केली. पण, रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यात गर्भवतीची तब्बेत खालावली आणि त्यातच जीव गेला.

दरम्यान, काही मंत्री, आमदार यांनीही रुग्णालय प्रशासनाला फोन केले. परंतु प्रशासन काेणाचे ऐकले नाही. प्रसूती वेदना वाढल्याने नाईलाजाने सुशांत यांनी वाकड येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये तनिषा यांना नेण्याचा निर्णय घेतला. मात्र तातडीने ॲम्ब्युलन्सही उपलब्ध झाली नाही. शेवटी खासगी गाडीनेच त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सिझेरियनद्वारे प्रसूती झाली. तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार जवळच्या मणिपाल रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आले. तोपर्यंत फार उशीर झाला होता. योग्य उपचार न मिळाल्यामुळे तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गर्भवतीचे पती सुशांत भिसे यांनी केला आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांसह पुणे शहर हादरून गेले आहे.

गर्भवतीची शारीरिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. नातेवाइकांकडून खोटे व चुकीचे आरोप केले जात आहेत. त्या संदर्भातील अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर केला आहे. मीडियात सध्या ज्या बातम्या येत आहेत त्या अर्धवट आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे
- डॉ. धनंजय केळकर, संचालक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

Web Title: pune Deputy Chief Minister Ajit Pawar spoke directly about the negligence case at Dinanath Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.