Pune Crime : तू बोगस डॉक्टर… ५ लाख दे नाहीतर हॉस्पिटलची बदनामी..!; डॉक्टरला मारहाण, आठ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 12:26 IST2026-02-22T12:04:26+5:302026-02-22T12:26:42+5:30
सासवड येथे जुन्या वादातून डॉक्टरला मारहाण; आठ जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

Pune Crime : तू बोगस डॉक्टर… ५ लाख दे नाहीतर हॉस्पिटलची बदनामी..!; डॉक्टरला मारहाण, आठ जणांवर गुन्हा
सासवड : सासवड शहर परिसरात जुन्या वादातून एका डॉक्टरला खंडणीसाठी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक व ग्रामपंचायत राजकारणातील वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सुभाष दत्तात्रय शिवतारे (वय ३६) यांनी सासवड पोलिस ठाण्यात माहिती अधिकार कार्यकर्ते व ग्राहक हक्क संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष महेश राऊत यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
‘तू ग्रामपंचायत राजकारणात माझे ऐकत नाहीस, त्यामुळे तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन. तू बोगस डॉक्टर आहेस. तुझ्या हॉस्पिटलची बदनामी करून तुझे करिअर संपवीन. मी केलेला अर्ज मागे घ्यायचा असेल तर ५ लाख रुपये दे,’ अशी धमकी देत आरोपीने शिवीगाळ केली व डॉक्टर शिवतारे यांना मारहाण केली.
औषधोपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, सासवड येथे गेल्यानंतरही आरोपींचा धुडगूस सुरूच राहिला. तेथे अमोल नामदेव पवार, लोकेश महेश राऊत, आदित्य सुनील राऊत, सचिन सुधाकर राऊत, जितेंद्र मारुती राऊत व ओम जितेंद्र राऊत यांनी शुभम व आकाश जाधव यांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. सदर गुन्ह्याचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
सासवडमधील खासगी दवाखान्यातील अनियमित सेवेच्या विरोधात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितल्याने तसेच सदर विषयाचे वार्तांकन वृत्तपत्रात छापून आल्याने माझ्यावर वैयक्तिक आकस ठेवून मला देखील मारहाण करण्यात आली व माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझी देखील ऑनलाहन तक्रार दाखल केली असून यावर पोलिस अधिक तपास करीत असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते महेश राऊत म्हणाले.