Pune Crime : नेहमी दागिन्यांचाच हट्ट कशाला? रागातून पतीकडून पत्नीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:56 IST2026-01-24T12:55:50+5:302026-01-24T12:56:10+5:30
वारंवार सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून पतीकडून पत्नीची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime : नेहमी दागिन्यांचाच हट्ट कशाला? रागातून पतीकडून पत्नीची हत्या
पुणे -पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई परिसरात कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आले असून, पत्नी वारंवार सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत असल्याच्या रागातून पतीने तिची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
नम्रता शैलेंद्र व्हटकर (वय १९, रा. शिरसवडी) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय ३०, रा. बकोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र व्हटकर याने पत्नी नम्रता हिला वाडेबोल्हाई परिसरात बोलावून घेतले होते. पत्नी वारंवार सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत असल्याचा राग त्याच्या मनात होता. याच वादातून शैलेंद्र याने नम्रता हिच्यावर चाकूने गळा आणि चेहऱ्यावर वार करत तिची निर्घृण हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असून, पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.