Pune crime :घरातून कामाची संधी..; ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने दोघांना आठ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 19:27 IST2025-09-02T19:24:49+5:302025-09-02T19:27:41+5:30
ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी व त्यातून चांगला परतावा देण्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्यांनी सुरुवातीला तरुणीला ऑनलाइन पद्धतीने काम दिले.

Pune crime :घरातून कामाची संधी..; ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने दोघांना आठ लाखांचा गंडा
पुणे : घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) आणि त्या माध्यमातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी खडकी येथील एका तरुणीची आणि मुंढव्यातील एका तरुणाची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणी खडकी आणि मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
खडकी परिसरातील एका तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी मेसेज पाठविला हाेता. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी व त्यातून चांगला परतावा देण्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्यांनी सुरुवातीला तरुणीला ऑनलाइन पद्धतीने काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर तिला परताव्यापोटी काही रक्कम दिली. परतावा मिळाल्याने तरुणीचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी तिला ऑनलाइन टास्कमध्ये आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. तरुणीने २६ ते ३१ जुलै या कालावधीत चोरट्यांच्या खात्यात ४ लाख १६ हजार रुपये जमा केले. मात्र, तरुणीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी मोबाइल क्रमांक बंद लागला. आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने खडकी पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात फिर्याद दिली. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.
अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी मुंढवा परिसरातील एका तरुणाची तीन लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम करत आहेत.