धायरी : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ प्रवाशांना कारमध्ये बसवून, नंतर काही अंतरावर नेऊन मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये एक हुंडाई कार व चोरी केलेला आयफोनचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी निखील अरविंद पवार (वय २७, रा. वेताळनगर, आंबेगाव बुद्रुक) आणि रोहन शाम पवार (वय २७, रा. मानाजीनगर, नऱ्हे) हे आहेत.अधिकच्या माहितीनुसार, ३० मे रोजी कोल्हापूरला जाण्यासाठी नवले पुलाजवळ स्वर्णा हॉटेल समोर उभ्या असलेल्या फिर्यादीला लाल रंगाच्या चारचाकी गाडीतील चालकाने गाडीत बसवले. कोल्हापूरला जायचे असल्याचे सांगितल्यावर ४०० रुपये भाडे सांगितले. काही अंतर गेल्यावर, कारमध्ये आधीच बसलेल्या चार तरुणांनी फिर्यादीवर हल्ला केला. त्यांनी लाथाबुक्यांनी व लोखंडी हत्याराच्या मुठीने मारहाण करून, मोबाईल फोन, कानातील सोन्याची बाळी, रोख रक्कम, चांदीची अंगठी असा ऐवज हिसकावला आणि फिर्यादीला रस्त्यातच उतरवले.घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी तपास पथकाला तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपास पथकातील पोलीस अंमलदारांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी निखील पवार याला नऱ्हे येथील भूमकर चौकात ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी पुढे कारवाई करत रोहन पवारलाही ताब्यात घेतले.गुन्ह्यातील आणखी एक आरोपी वेगळ्या गुन्ह्यात चिखली पोलिसांच्या ताब्यात असून, चौथा आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, तसेच अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, निलेश भोरडे, राहुल ओलेकर, गणेश झगडे, विनायक मोहिते, सतिष मोरे, संदिप कांबळे, तानाजी सागर, समीर माळवदकर, शिरीष गावडे यांच्या पथकाने केली.
फक्त मौजमजेसाठी जबरी चोरीतपासात उघड झाले की आरोपींना ब्रँडेड कपडे, खाद्यपदार्थ आणि ऐषआरामाची आवड आहे, मात्र पैसे नसल्याने त्यांनी मौजमजेसाठी हा गुन्हा केला. त्यांनी यापूर्वीही अशा पद्धतीचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत.