हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 14:24 IST2025-05-25T14:23:40+5:302025-05-25T14:24:56+5:30
अजय पवार याने माझा तुझ्याशी टाईमपास चालू आहे तू मेली तरी चालेल असे म्हणत तिला चारचाकी गाडी मागण्यासाठी वडिलांना सांगण्याचा दबाव टाकला.

हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
पुणे – शहराच्या लोहगाव परिसरात सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका २३ वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात पती, सासू आणि दीराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेचा विवाह २२ मे २०२२ रोजी अजय पवार यांच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पती अजय पवार याने घरगुती कारणांवरून मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याची तक्रार महिलेने दिली आहे.
सासू कमल पवार या वारंवार “तुझ्या माहेराकडून काहीच आणलं नाहीस, तुमची काही लायकी नाही,” अशा शब्दांत तिला हिणवत होत्या. याच दरम्यान अजय पवार याने “माझा तुझ्याशी टाईमपास चालू आहे, तू मेली तरी चालेल” असे म्हणत, तिला चारचाकी गाडी मागण्यासाठी वडिलांना सांगण्याचा दबाव टाकला. नकार दिल्यानंतर त्याने पत्नीचा गळा दाबून पुन्हा मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादीच्या दीर मनोज पवार याने देखील तिला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. २१ मे रोजी सासूने तिला “पहिल्या सुनेलाही घराबाहेर काढलं, तुलाही काढीन” अशी धमकी दिली. “तू पांढऱ्या पायाची आहेस, तुझी नजर चांगली नाही, तु घरात आल्यापासून शांतता नाही,” असे अपमानास्पद वागणूक दिली गेली. या सलग मानसिक त्रासामुळे हतबल होऊन फिर्यादीने झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळेत उपचार झाल्याने तिचा जीव वाचला असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. तिने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अजय पवार, कमल पवार आणि मनोज पवार यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.