Pune Crime : सिंहगड रस्त्यावर थरार…! रुमाल बांधून आलेल्या चौघांचा तरुणावर वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 19:23 IST2026-02-21T19:22:58+5:302026-02-21T19:23:39+5:30
- दोन दुचाकींवरून आलेल्या चार तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून अचानक त्याच्यावर हल्ला चढवला.

Pune Crime : सिंहगड रस्त्यावर थरार…! रुमाल बांधून आलेल्या चौघांचा तरुणावर वार
धायरी (पुणे) :पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनेमुळे हादरला आहे. माणिकबाग भागात शनिवारी सायंकाळी १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान माणिकबाग परिसरातील बर्गर किंग दुकानासमोर हा तरुण उभा होता. त्याच वेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चार तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून अचानक त्याच्यावर हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी काही कळण्याच्या आत धारदार शस्त्राने वार करत मुलाला रक्ताच्या थारोळ्यात सोडले आणि घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून आरोपींचा शोध सुरू आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भरवस्तीत झालेल्या या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सिंहगड रस्ता परिसर हा कायम वर्दळीचा असल्याने दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. गुन्हेगारांना लवकर अटक करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.