कोथरूडमध्ये दहा फ्लॅट्स जबरदस्तीने बळकावले; नीलेश घायवळविरुद्ध ‘मकोका’ कायद्यान्वये तिसरी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:24 IST2025-11-12T16:22:56+5:302025-11-12T16:24:02+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून परदेशात गेलेला घायवळ याच्या विरोधात कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल झाले आहेत.

कोथरूडमध्ये दहा फ्लॅट्स जबरदस्तीने बळकावले; नीलेश घायवळविरुद्ध ‘मकोका’ कायद्यान्वये तिसरी कारवाई
पुणे : महिला व्यावसायिकाला धमकावून ४५ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गुंड नीलेश घायवळ याच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून परदेशात गेलेला घायवळ याच्या विरोधात कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल झाले आहेत.
कोथरूड गोळीबार प्रकरण, बांधकाम व्यावसायिकाला धमकावून फ्लॅट्सचा ताबा घेणे तसेच महिला व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली आहे. आतापर्यंत घायवळविरोधात मकोका कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
घायवळच्या संपत्तीबाबत पुणे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. घायवळच्या संपत्तीची चौकशी करण्याबाबत पुणे पोलिसांकडून अंमलबजावणी संचालनालयाशी (ईडी) पत्रव्यवहार करण्यात आला आहे. घायवळ सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवून तो परदेशात गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पोलिसांनी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे.
घायवळ टोळीने धाराशिव, अहिल्यानगर, बीड, सातारा, पुणे जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे. घायवळ टोळीने जमीन बळकावण्याचे गुन्हे केले आहेत. बेकायदा मार्गाने त्याने संपत्ती जमा केली आहे. घायवळच्या संपत्तीची तपासणी करण्यात यावी, याबाबत पुणे पोलिसांनी नुकतेच ‘ईडी’लादेखील पत्र पाठवले आहे.
घायवळचा भाऊ सचिन याच्याविरोधात ‘मकोका’ कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड भागात नव्याने बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील दहा फ्लॅट्स जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी सचिन, नीलेश घायवळ याच्यासह साथीदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. शाळेतील उपाहारगृहासाठी खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या एका महिलेला धमकावून तिच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी घायवळ याच्यासह त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नीलेश घायवळचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी पोलिसांकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याबाबत इंटरपोलशीदेखील संपर्क साधण्यात आला आहे. घायवळला ताब्यात घेण्यासाठी ब्लू काॅर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. घायवळने अहिल्यानगर ग्रामीण पाेलिस दलातील अहमदनगर विभागातून बनावट कागदपत्रे सादर करीत, ‘घायवळ’ऐवजी ‘गायवळ’ नावाने बनावट कागदपत्रे सादर करून २०१९ मध्ये पासपोर्ट मिळवला. अहमदपूर पोलिसांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया केली होती.