इंदापूर येथे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 11:31 IST2025-10-11T11:30:51+5:302025-10-11T11:31:05+5:30
वाळूचा साठा करून त्यांच्याकडे असलेल्या टिप्परमध्ये जेसीबीच्या साहाय्याने ती वाळू चोरून नेतात,

इंदापूर येथे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; गुन्हा दाखल
इंदापूर : बेकायदेशीर वाळू उपसा करून, साठा केलेली वीस हजार रुपये किमतीची तीन ते चार ब्रास वाळू पळवून नेल्याच्या आरोपावरून दोघा जणांविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज राजाराम फलफले (रा. गलांडवाडी नं. २, ता. इंदापूर) ज्ञानदेव खबाले (रा. भाटनिगाव, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. गागरगावचे ग्राम महसूल अधिकारी हेमंत दिलीप भागवत यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, उपरोक्त आरोपी आपल्या साथीदारांच्या मदतीने वनगळी गावच्या हद्दीमधील उजनी जलाशयातील वाळूचे बेकायदा उत्खनन करतात. वाळूचा साठा करून त्यांच्याकडे असलेल्या टिप्परमध्ये जेसीबीच्या साहाय्याने ती वाळू चोरून नेतात, अशी माहिती मिळाल्यानंतर दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून २० मिनिटांनी फिर्यादी आपल्या सहकारी व पोलिस पथकासमवेत घटनास्थळी आले. त्यांचा सुगावा लागल्याने आरोपी त्यांच्याकडील टिप्परमध्ये २० हजार रुपये किमतीच्या अंदाजे ३ ते ४ ब्रास वाळूची चोरी करून गेले होते, अशा आशयाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.